आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खा. दानवे म्हणाले, राजकारणात काहीही शक्य, गोरंट्यालही असू शकतात उमेदवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना -चार वर्षांत खासदार दानवे यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून शहर विकासासाठी ‘न भूतो न भविष्यति’ अशी विकासकामे सुरू केली, अशा शब्दांत माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष  दानवे यांचे तोंडभरून कौतुक केले, तर खासदार दानवेंनी या कौतुकाची परतफेड करताना गोरंट्याल यांना सूचक शब्दात विधानसभेची ऑफर देऊ केली.

 

गोरंट्याल यांनी त्यास नकार देताच  संगीता गोरंट्याल भाजप उमेदवार असू शकतील, कारण राजकारणात काहीही होऊ शकते, असे दानवे यांनी मिश्किलपणे सांगत खळबळ उडवली. खोतकर-दानवे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर श्यामाप्रसाद मुखर्जी भवनच्या भूमिपूजन समारंभात रंगलेले या राजकीय टाेलेबाजीने शहराचे राजकारण मात्र आता नव्या वळणावर पोहाचले आहे.


  ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’  हे राजकारणातले गुपित या निमित्ताने उघड झाले. माजी आ. गोरंट्याल यांनी खोतकरांच्या विधानसभेतील निवडीला न्यायालयात आव्हान दिले, तर खोतकरांनी लोकसभेची तयारी सुरू केल्याने खोतकर-दानवे यांच्यातील वितुष्ट वाढले.

 

या पार्श्वभूमीवर दानवे व गोरंट्याल यांची वाढलेली जवळीक खोतकरांसाठी अप्रत्यक्ष इशारा मानला जात आहे.  दानवे हे राज्यात पाॅवरफूल नेते आहेत.  मागणी केली तेव्हा त्यांनी शहर विकासासाठी निधी दिला असे कैलास गोरंट्याल यांनी दानवेंचे कौतुक केले. दानवेंनीही  तुम्ही त्यांच्यासोबत (मंत्री खोतकर) राहू नका, त्यामुळे तुम्हाला मोठा धोका होईल असा सल्ला दिला. 

 

२०१४ निवडणुकीतील चित्र  
२०१४ च्या विधानसभेत  मंत्री खोतकर शिवसेना, कैलास गोरंट्याल काँग्रेस, अरविंद चव्हाण भाजप तर अब्दूल रशीद पहिलवान बसपकडून लढले. यात खोतकरांनी विजय मिळवला तर गोरंट्याल, चव्हाण आणि अ. रशीद पहिलवान यांनीही अपेक्षेपेक्षा  अधिक मते मिळवली होती.

 

२०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर... 
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर आता जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कोणत्याही एका नेत्याने पक्षांतर केले तर  इतर पक्षातही पक्षांतराची लाट येऊ शकते. त्यामुळे २०१४ मध्ये असलेले राजकीय समीकरण पूर्णपणे उलटे होण्याची शक्यता  आहे. याची सुरुवात अब्दूल रशीद पहिलवान यांनी केली . वर्षभरापूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

 

व्यंकटेश गोरंट्याल यांचा वारसा चालवा   

माजी नगराध्यक्ष व्यंकटेश गोरंट्याल यांनी सुरुवातीच्या काळात आम्हा भाजप कार्यकर्त्यांना मोठी मदत केली. त्यांच्या मदतीतून आम्ही अनेक कार्यक्रम घेतले. मात्र त्यांचा वारसा काही लोकांना पुढे चालवता आला नाही, असे गोरंट्याल यांना उद्देशून दानवे म्हणाले. तर तुमच्या दोघांचे (गोरंट्याल-खोतकर) मिटले तर ठीक, नाही मिटले तरी ठीक. पंक्चर टायरच्या जागेवर तुमचा टायर बसवतो असे म्हणत प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी गोरंट्याल यांना उमेदवारीचे संकेत दिले. 

 

बातम्या आणखी आहेत...