आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरळी- बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या महाशिवरात्र यात्रा महोत्सवास मंगळवारपासून सुरुवात होत असून मंदिर परिसरात १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले अाहेत. तर सुरक्षेसाठी ३०० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक भाविकाला सहजपणे दर्शन घेता यावे यासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा लावण्यात येणार आहेत.
येथील वैद्यनाथ मंदिराच्या उत्तर पायऱ्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले असून मोठा मंडपही उभारण्यात आला आहे. मंगळवार १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान वैद्यनाथ देवस्थान कमिटीतर्फे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या हस्ते प्रभू वैद्यनाथास रुद्राभिषेक करून शासकीय पूजा होणार असून यानंतर भाविकांना अभिषेक करता येणार आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने वैद्यनाथ मंदिरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली असून २ सहायक पोलिस अधीक्षक, ५ पोलिस निरीक्षक, २२ पोलिस अधिकारी, ३४५ महिला व पुरुष पोलिस, २५ पोलिसांची २ दंगल नियंत्रण पथके , डीबी पथक, शहर वाहतूक पथक, श्वान पथक , बॉम्ब नाशक पथक, अग्निशमन पथक तैनात केल्याची माहिती परळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत मानकर यांनी दिली आहे. कोणतीही संशयित वस्तू वा व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान सोमवार रात्री पासूनच वैद्यनाथ मंदिरात भाविकांची गर्दी वाढत होती.
शंभर रुपयांच्या पासची व्यवस्था
वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या पुरुष व महिलांच्या दोन वेगवेगळ्या रांगा लावण्यात येणार आहेत. यात पासधारकांची वेगळी रांग असणार आहे. महाशिवरात्री निमित्त १०० रुपयांचा पास ठेवण्यात आला आहे. या दर्शन पासची विक्री मंदिर परिसरात उत्तर पायऱ्यांवरील स्टॉलमध्ये करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.