आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींची हत्या नाकारण्याचाच प्रयत्न होतोय; त्यांच्यावर चौथी गोळीही झाडली गेली होती!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


उस्मानाबाद- गांधीजींवर चाैथी गोळी झाडल्याचा दावा करून त्यांची हत्या नाकारण्याचाच प्रयत्न होत आहे. अपप्रचार करून हत्येचे समर्थन करणारेच आता ७० वर्षानंतर गांधीजींची हत्याच पुसण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी केला. 


माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी (दि. २५) आयोजित व्याख्यानात ते बोलत हाेते. व्यासपीठावर नानासाहेब पाटील, पंचायत समितीचे सभापती बालाजी गावडे, नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते युवराज नळे उपस्थित होते. 


गांधीजींवर चौथी गोळी झाडली गेली होती, असा दावा करत सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या हत्येची पुनर्तपासणी करण्याची मागणी करण्यात आल्याचे तुषार यांनी सांगितले. त्यांच्या हत्येनंतर ७० वर्षांनी त्यांची हत्या नाकरण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे.  दोन गोळ्या शरीराच्या मागून बाहेर पडल्या. यापैकी एक गोळी त्यांच्या पार्थिवाजवळ तपासादरम्यान सापडली. दुसरी गोळी गांधीजींच्या शालीत अडकलेली होती. मनुबेन (मृदुला गांधी) यांनी ती तुघलक पोलिस ठाण्यात दिली. तिसरी गोळी शरीरातच होती. ती त्यांच्या अस्थिंमध्ये सापडली. कपूर आयोगासमोर साक्ष देतेवेळी मोरारजी देसाई यांनी त्यांना घटना स्मृतीत नसल्याचे सांगितले होते. मात्र, मनुबेन यांनी सर्व बाबी साक्षीत नमूद केल्या. काही ठिकाणी दस्तांमध्ये बोलीभाषेच्या वाक्यानुसार तीन – चार गोळ्या झाडल्या असे म्हटण्यात आले हाेते. याचा आधार घेऊन चौथ्या गोळीचे षड्यंत्र समोर आणले आहे. हे षड्यंत्र हाणून पाडण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. 


हाच तर गुन्हा...
गांधी हत्येच्या संदर्भात होणाऱ्या गैरप्रचाराला विरोध न करणे हाच गांधीवाद्यांचा मोठा गुन्हा आहे. गांधीजींचे मंदिर कधीच निर्माण होऊ देणार नाही. मात्र, राज घाटावर खोटे अश्रू ढाळणारे कोणते नेते नथुरामच्या मंदिरात जाणार आहेत, याचे अवलोकन करायचे आहे,  असेही तुषार गांधी म्हणाले. 


हिंदूविरोधी भूमिका नव्हती
गांधींनी कधीच हिंदू विरोधी भूमिका घेतली नाही. खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसचा होता. सुरावर्दी व टिपेरा येथील हिंदूंची कत्तल रोखण्यासाठी ते कोलकात्याला गेले होते. लोकमान्य टिळकांच्या पुढाकारातून मुस्लिमांना त्यांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक लाभ देण्याचा लखनऊ करार झाला होता. मात्र, गांधींविषयी अपप्रचार करण्यात आला, असाही दावा तुषार गांधी यांनी केला.

 

उपोषण दिल्लीच्या नरसंहारासाठी 
गांधीजींनी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्यासाठी उपोषण केले नाही. ७५ कोटी देण्याचे ठरले होते. त्यातील २० कोटी १३ ऑगस्ट १९४७ ला दिले. नंतर पाकिस्तान अस्तित्वात आल्यावर सर्वच घटकांची वाटणी झाली. त्यात अतिरिक्त ५५ कोटी देण्याचा दोन देशांत करार झाला. गांधींजींनी केवळ करार झाल्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. त्या दरम्यान दिल्लीत होणारा संभाव्य हिंसाचार थांबवण्यासाठी गांधीजींनी उपोषण केले. मात्र, याचा अपप्रचार केला, असेही तुषार गांधी म्हणाले.  

बातम्या आणखी आहेत...