आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान भाऊ विहिरीत पडताच मोठ्याने वाचवण्यासाठी उडी घेतली; दोघांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- जवळच खेळत असलेला पाच वर्षांचा लहान भाऊ खेळताना विहिरीत पडल्याचे लक्षात येताच दहा वर्षांच्या मोेठ्या भावाने क्षणाचाही विलंब न करता त्याला वाचवण्यासाठी पोहता येत नसतानाही विहिरीत उडी घेतली. मात्र, त्या  चिमुकल्याचे प्रयत्न निष्फळ ठरले अन् विहिरीत बुडून दोघाही भावंडांचा करुण अंत झाला.  हृदय हेलावणारी ही घटना बीड तालुक्यातील भवानवाडी येथे सोमवारी सकाळी घडली. दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे भवानवाडी गाव सुन्न झाले आहे.


लक्ष्मण बाबूराव मुंडे हे भवानवाडी येथे कुटुंबासमवेत  वास्तव्यास आहेत. सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेला सुट्टी असल्याने त्यांची मुले घरालगतच खेळत होती. खेळत असताना विक्रम मुंडे( ५ ) हा जवळच असलेल्या विहिरीत पाय घसरून पडला. विक्रम विहिरीत पडल्याचे   त्याच्या सोबत खेळत असलेला मोठा भाऊ प्रमोद ( १०) याने पाहिले. त्याने क्षणाचाही विलंब न करता आपला लहान भाऊ  विक्रमला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. मात्र, त्यालाही पोहता येत नसल्याने दोघेही भावंडे बुडाली. ही घटना काही नागरिकांच्या लक्षात आली. नागरिकांनी दोघांनाही वाचवण्याचे प्रयत्न केले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. दोघांनाही पाण्यातून काढून तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले.  मात्र तो पर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. जिल्हा सामान्य रुग्णालयातच त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.  मृत भावंडांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर गावातील अनेक घरांत चूलही पेटली नाही. ़


गावकऱ्यांना झाले अश्रू अनावर
लहान भावाचे प्राण वाचवण्यासाठी वयाने लहान पण मोठा भाऊ म्हणून  आपली जबाबदारी ओळखत अवघ्या दहा वर्षांच्या दुसऱ्या भावानेही विहिरीत उडी घेतली. पण काळाने दोघांवरही झडप घातली. दोघांनाही पोहता येत नव्हते. या घटनेने भवानवाडी गाव सुन्न झाले आहे.  चिमुकल्या भावंडांचे मृतदेह पाहून गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले.


रुग्णालयात नातलगांचा आक्रोश
दोन्ही भावांना विहिरीबाहेर काढून चुलते अरुण बाबूराव मुंडे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले.  यानंतर नातेवाइकांनी रुग्णालयात केलेल्या आक्रोशाने सगळेच स्तब्ध झाले होते.

बातम्या आणखी आहेत...