आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांच्या सह्या इंग्रजीतून, ११ वेळा अध्यादेश काढूनही मायमराठीची वाताहत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - सातत्याने ११ वेळा अध्यादेश काढूनही मायमराठीची वाताहत अद्यापही सुरूच आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सह्या अद्यापही इंग्रजीतूनच सुरू आहेत. डिजिटल इंग्रजीतली स्वाक्षरी बदलण्यासाठीही कोणतेच आदेश नाहीत. आर्थिक व्यवहारासाठीचा सहीचा नमुनाही तसाच आहे. यामुळे मायमराठीच्या अंमलबजावणीचा अध्यादेश नेमका कोठे अडकला, याबाबत संभ्रम आहे.


मायमराठीचे संवर्धन होण्यासाठी राज्य शासनाने वाजतगाजत मराठी वापराचा अध्यादेश काढला. शासनाने अध्यादेश काढून सामाजिक स्तरावर स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र, याची अंमलबजावणी पूर्वीच्या ११ आदेशाप्रमाणे बासनात गुंडाळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अध्यादेशामध्ये मराठी भाषेतून कामकाज करण्याबरोबरच विविध शासकीय कार्यालयाबाहेर लटकवलेल्या पाट्या, अधिकाऱ्यांच्या टेबलावरचे नामफलक तसेच स्वाक्षरीसुद्धा मराठीतून करण्याबाबत अध्यादेशामध्ये बजावले आहे. या अध्यादेशानुसार आतापर्यंत किमान बदलाच्या प्रक्रियेला तरी सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, कोणत्याच कार्यालयात स्वाक्षरी बदलाला सुरुवात झालेली नाही.


‘दिव्य मराठी’ने जिल्हा परिषद व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील इंग्रजी पाट्यांचा मुद्दा चव्हाट्यावर आल्यानंतर काही कार्यालयात इंग्रजीच्या पाट्या व नामफलक बदलण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पूर्ण मराठी भाषा वापराबाबत उदासीनताच दिसून येत आहे. स्वाक्षरी मराठीतून करण्यासंदर्भात सुरुवात होणे अपेक्षित होते. तरीही याबाबत अधिकृत आदेश प्रशासकीय स्तरावर देण्यात आलेले नाहीत. यामुळे अनेक विभागातील अधिकारी, कर्मचारी इंग्रजीतूनच स्वाक्षरी करत असताना दिसून येत आहेत. पूर्वी आर्थिक व्यवहारासाठी दिलेल्या इंग्रजी स्वाक्षरीचा नमुना बदलण्याबाबत काहीच हालचाल नाही. शासन व प्रशासनाच्या अशा उदासीनतेमुळे माय-मराठीचा अध्यादेश पुन्हा वाऱ्यावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

काहींचा सराव सुरू 
मराठीचा आग्रह धरणे अपेक्षित असल्यामुळे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठी स्वाक्षरीचा सराव सुरू केला आहे. मात्र, त्यांनाही कोणताच आदेश मिळाला नसल्यामुळे मराठी स्वाक्षरी वापरण्याबाबत त्यांच्यामध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक  तातडीने याबाबत आदेश काढणे अपेक्षित असताना काहीच हालचाल दिसत नाही.

 

मोठा कालावधी जाणार
मराठीतून स्वाक्षरी बदलण्यासाठी मोठा कालावधी जाणार आहे, हे सत्य असले तरी बदलाची सुरुवात अद्यापही करण्यात आलेली नाही. यामुळे सुरुवात केव्हा होणार व बदल केव्हा संपणार, याबाबत साशंकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

डिजिटल स्वाक्षरीही इंग्रजीतूनच
सर्व कारभार ऑनलाइन करण्याच्या दृष्टीने गेल्या दोन वर्षांपूर्वी डिजिटल स्वाक्षरीची संकल्पना समोर आली. त्यानुसार ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षऱ्या तयार करण्यात आल्या. यातील बहुतांश जणांच्या सह्या इंग्रजीतून आहेत. आता त्या सह्या बदलण्याची गरज असतानाही याबाबत कोणताच आदेश प्रशासकीय स्तरावर नाही.

 

तातडीने आदेश
मराठीतून स्वाक्षरी करण्याबाबतचे तातडीने आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत. यासाठी अध्यादेशातील सर्वच बाबींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

-राजेंद्र खंदारे, निवासी उपजिल्हाधिकारी.

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...