आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी महापालिकेची 12 जणांवर कारवाई; उघड्यावर लघुशंका व कचरा टाकण्याविरोधात मोहीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- उघड्यावर कचरा टाकणे व लघुशंका करण्याच्या प्रकारांविरोधात महापालिकेने मोहीमच हाती घेतली असून शनिवारी १२ जणांवर दंडात्मक कारवाई केली. मनपाने उघडयावर कचरा टाकली जाणारी व लघुशंका केली जाणारी ठिकाणेच घोषित केली असून यापुढे या ठिकाणांवर असे प्रकार घडल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.  


महापालिका दुर्गंधीमुक्त घोषित करण्यात आली आहे. तत्पुर्वी, मनपाने शहरात ४८ सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधली आहेत. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेवून उघडयावर शौचास जाणारांविरुद्ध थेट पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. यासाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांचे पथकच तैनात केले होते. कारवाईच्या बडग्याने उघडयावर शौचास जाणारांचे प्रमाण जवळपास घटले आहे. आता बहुतांश ठिकाणी सार्वजनिक शौचालये व स्वच्छतागृहे तयार झालेली असल्याने मोकळ्या जागांवर लघुशंका करण्यासही मज्जाव केला आहे. तरी देखील शहरातील ३३ ठिकाणी लघुशंका उघडयावर केल्या जात असल्याचे मनपाच्या निदर्शनास आले आहे. अशा ठिकाणांची यादीच मनपाने प्रसिद्ध केली असून यापुढे उघडयावर लघुशंका केल्यास कारवाई केली जाणार आहे. त्यादृष्टीने शनिवारी पथकाने नटराज रंग मंदिराची संरक्षण भिंत, शहाणे दुकानासमोर, स्टेशन रोड, मुल्ला मशीद जवळ, जिल्हा परिषद ते उड्डाण पुल, अनुसया चित्र मंदिर, गंगाखेड रोड अशा ठिकाणी लघुशंका करणारांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. जाहीर केलेल्या ठिकाणांवर व सार्वजनिक जागेवर लघुशंका केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे. 

 

कचऱ्याप्रकरणी दोघांवर कारवाई 
मनपाने घंटागाड्या व कचरा संकलनासाठी मोठी वाहने नियुक्त केली आहेत. त्यातही ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी मोठी जनजागृती सुरू केली आहे. तरी देखील शहरातील २८ सार्वजनिक ठिकाणांवर कचरा फेकला जात असल्याचे मनपाच्या निदर्शनास आले आहे. त्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून गांधी पार्क व गुजरी बाजारातील विहीरीसमोर कचरा टाकणाऱ्या दोघांवर दंडात्मक कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...