आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना - तीन वर्षे कालावधीत १८५ काेटी रुपये खर्चून शेतकऱ्यांची पहिली औद्योगिक वसाहत परतूर तालुक्यातील आष्टी या गावामध्ये २० एकर जागेत तयार होत आहे. यामुळे शेतकरी उद्योजक होण्यासोबतच उत्पन्न वाढण्यास मदत हाेत आहे. याचा १६ गावांना लाभ होणार आहे.
या प्रकल्पात १८ प्रकारच्या कृषी, कृषी पूरक व इतर सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून विक्रीसाठीचेही धडे दिले जाणार आहेत. याबाबतच्या संदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील परतूर तालुक्यात रुर्बन व मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती आदींची उपस्थिती होती. या औद्योगिक वसाहतीत रेशीम, तेलबिया, फळ, कपाशीपासून धागा तयार करणे, दुग्धजन्य पदार्थ तयार करणे आदी उद्योग उभे राहणार आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उत्पादनांवर त्याच शेतकऱ्यांच्या औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखान्यांमधून किंवा उद्योगांच्या माध्यमातून प्रकिया केली जाणार आहे.
यामुळे उत्पन्नासोबतच रोजगार संधीही निर्माण होणार आहे. यासाठी तीन वर्षे कालावधीचा आणि १८५ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मानव विकास मिशन अंतर्गत ५० तर श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनच्या माध्यमातून ५० प्रकल्प यामध्ये हाती घेण्यात येतील. एका शेतकरी समूहात ५० सदस्य राहून, ३०० कुटुंबांना याचा लाभ मिळेल. प्रस्तावित प्रकल्पात आष्टी परिसरातील १६ खेड्यांना याचा लाभ होईल. यात ६० शेतकरी समूह गट स्थापन करण्यात येतील. प्रस्तावित रुरर्बन प्रकल्पामध्ये मुलभूत सोयी सुविधा, सर्व सुविधा युक्त ६० उद्योग, यंत्रसामग्री, प्रशिक्षण, क्षमतावृद्धी आणि साहाय्य या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
१८५ कोटींचा आराखडा : शेतकऱ्यांच्या उत्पादनांवर त्याच शेतकऱ्यांच्या औद्योगिक वसाहतीतील विविध उद्योगांच्या माध्यमातून प्रकिया होईल. याबाबतचा १८५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आल्याचे पालकमंत्री लोणीकर यांनी सांगितले.
प्रकल्पाला मिळतेय चालना
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येण्याच्या सूचना दिल्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार अाहे. यामुळे लवकरच या कामाला सुरुवात हाेण्याच्या हालचाली सुरू झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या, कसा असेल प्रकल्प...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.