आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेर - उस्मानाबाद तालुक्यातील डकवाडी येथे सोमवारी (दि.१९) दोन शाळकरी मुले साठवण तलावावर मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान, डकवाडी हे गाव जागजी प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असल्याने त्यांचे मृतदेह तेर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेले असता वादाच्या हद्दीत दोन तास ताटकळावे लागल्याने आरोग्य यंत्रणेच्या असंवेदनशीलतेविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.
प्रणव साहेबराव डक (१२) व सुमित बालाजी डक (८) ही दोन मुले सोमवारी (दि.१९) घरच्यांना न सांगता जवळच्या पाझर तलावात मासे पकडण्यासाठी गेले होते. शोधाशोध केल्यावर सायंकाळी सातच्या सुमारास तलावाच्या काठावर त्यांचे कपडे आढळले. त्यावरून ग्रामस्थांनी तलावात उड्या मारून त्यांचा शोध घेतल्यावर त्यांचे मृतदेह सापडले.
दरम्यान फौजदार विजयकुमार वाघ, हवालदार प्रकाश राठोड घटनास्थळी पोहोचले. मृत मुलांचे मृतदेह तेर ग्रामीण रुग्णालयात रात्री ११ वाजता शवविच्छेदनासाठी आणले. परंतु डकवाडी हे गाव जागजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत येत असल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. ग्रामस्थांनी जागजी येथे संपर्क साधला. परंतु तेथूनही उडवाउडवीची उत्तरे मिळाली. हद्दीच्या वादात व आरोग्य यंत्रणेच्या असंवेदनशीलतेमुळे मुलांचे मृतदेह रात्री एक वाजेपर्यंत जीपमध्येच राहिले. शेवटी रात्री दीडच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी ज्योती निर्मले यांनी शवविच्छेदन केले.
दोघांचाही एकाच चितेवर अंत्यविधी
मंगळवारी (दि.२०) सकाळी दोन्ही प्रणव व सुमीत डक या दोन्ही शाळकरी मुलांवर एकाच चितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोवळ्या वयात मुले जग सोडून गेल्यामुळे उपस्थितांची मने हेलावून गेली. घटनेमुळे डकवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्याने फोन बंद करून ठेवला
या प्रकरणात आरोग्य यंत्रणेची उदासीनता व असंवेदनशीलता उघड झाली. जागजी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एकदा फोन उचलून पुन्हा बंद करून ठेवला. शवविच्छेदनासाठी रात्री तेर येथे येण्यास त्यांनी असमर्थता दर्शवून सकाळी शवविच्छेदन करण्याची भूमिका घेतली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.