आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 चोरट्यांचा उच्छाद; दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न, 100 पोलिसांचे 5 तास ‘ऑल आऊट’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटरने कापून काढलेले एटीएम वाहनात टाकत असतानाच पोलिस धडकले. त्यामुळे चोरटे पसार झाले. - Divya Marathi
कटरने कापून काढलेले एटीएम वाहनात टाकत असतानाच पोलिस धडकले. त्यामुळे चोरटे पसार झाले.

बीड -  बीड शहरात पहाटे दोन वाजता एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चोरट्यांनी १५ किलोमीटरवरील दुसरे एटीएम गॅस कटरने जमिनीपासून वेगळे केले. एटीएम वाहनात भरत असतानाच पोलिस तेथे पोहोचले. चोरटे जीपमधून पसार होण्याची शक्यता पाहता जीपचालक पोलिसाने पोलिस जीप थेट चोरट्यांच्या जीपवर धडकवली. त्यामुळे त्यांचा वाहनाने पळून जाण्याचा मार्ग बंद झाल्याने  चोरट्यांनी पायीच धूम ठोकली.  मात्र पोलिसांचे सहा पथक व आरसीपी प्लाटून अशा   जवळपास १०० पोलिसांनी पहाटे २ ते सकाळी सात वाजेपर्यंत राबवलेल्या शोध मोहिमेत दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. 

 

दुपारनंतर तिसरा चोरटाही पकडला.  एखाद्या चित्रपटात शोभेल असा थरारक प्रसंग गुरुवारी पहाटे घडला. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी खालापुरी (ता. शिरुर) येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्नही याच चोरट्यांनी केल्याचे समोर आले आहे.  बीड शहरात बुधवारी पोलिसांकडून ऑपरेशन  ऑल आऊट सुरू होते. यामुळे सर्व  अधिकारी, पोलिस कर्मचारी आपापल्या भागात नाकेबंदी करत होते. पहाटे दोनच्या दरम्यान  राजीव गांधी चौक परिसरात चार्ली पथकातील व्ही. व्ही. उजगरे व के.एस. सानप यांना तेथील एटीएमच्या कॅमेऱ्यावर रंगाचा स्प्रे मारण्यात आल्याचे  लक्षात आले. त्याचवेळी एक जीपही संशयास्पदरीत्या जाताना दिसली.

 

त्यांनी याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे व पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्यासह नियंत्रण कक्षाला दिली. अधिकाऱ्यांनी एटीएमकडे धाव घेत पाहणी केली जीपने पिंपरगव्हाण रोडकडून गेल्याने ती राजुरीच्या दिशेने जाऊ शकते हे लक्षात घेऊन  खिरडकर व त्यांचे अंगरक्षक एम. बी. रोकडे यांनी  ही माहिती ग्रामीण पोलिसांना दिली.  पारगाव परिसरात गस्तीवर असलेले बीड ग्रामीण ठाण्याचे एएसआय दिनकर येकाळ, रशीद खान, गणपत लोणके, मनाेहर भुतेकर यांनी राजुरीकडे धाव घेतली.

 

चोरटे राजुरी येथील पूर्ण एटीएम उचकटून ते जीपमध्ये भरण्याच्या प्रयत्नात असतानाच  पोलिस तिथे पोहोचले.  पोलिसांची जीप बघून चोरटे  पसार होण्याची शक्यता असल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखत चालक रशीद खान यांनी पोलिस व्हॅनची थेट चोरट्यांच्या जीपला एका बाजूने धडक देऊन त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी केला. त्यामुळे जीप आणि एटीएम  तिथेच सोडून चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत  पळ काढला. पोलिसांनी काही अंतरापर्यंत त्यांचा पाठलागही केला. मात्र चोरटे पळाले.

 

एलसीबीने दोघे केले जेरबंद  
सकाळी सहा वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर  यांच्यासह मुंजाबा कुव्हारे, मोहन क्षीरसागर, सतीश कातखडे, प्रसाद कदम, नसीर शेख, विष्णू चव्हाण यांच्यासह इतरांनी चाेरटे कुठे जाऊ शकतात याचा अंदाज घेत कोम्बिंग ऑपरेशन रावबले. धाबे, हॉटेल व महामहार्गावर संशयितांची चौकशी केली. त्यांना स्थानिक नागरिकांनीही  मदत केली. गुरुवारी सकाळी सात वाजता त्यांनी विशाल बारिकराव राख ( २० रा. थेरला ) व बाळू भागवत मुंडे (रा. खालापुरी) या दोघांना धस पिंपळगाव शिवारातून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.  

 

श्वानाने दाखवला दोन किमी मार्ग  
घटनेची माहिती मिळाल्यानंतर एएसपी कलुबर्मे, डीवायएसपी खिरडकर व शिवाजीनगर ठाण्याचे पीआय शिवलाल पुरभे यांनी राजुरीत धाव घेत राजुरीच्या आजूबाजूला शोध मोहीम सुरू केली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञही पाचारण करण्यात आले. चोरट्यांच्या चपला व इतर साहित्यावरून श्वानाने जवळपास दोन किलोमीटरपर्यंत माग दाखवला.  

 

दुपारनंतर तिसरा चोरटाही पकडला  
दरम्यान, या विशाल अाणि बाळू यांनी दिलेल्या माहितीवरून एटीएम फोडणारी ही एकूण पाच जणांची टोळी असल्याचे समोर आले. यातील तिसरा आरोपी श्रावण गणपत पवार (रा. राजुरी) यास दुपारी पोलिसांनी राजुरीतून अटक केली.  

 

पाठलाग अयशस्वी  
घटनेनंतर शिवाजीनगर पोलिस, बीड ग्रामीण व शिरुर पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक विभाग व आरसीपी प्लाटून कामाला लागली. शिवाजीनगरचे पीआय पुरभे यांनी दुचाकीवरील दोघांचा  पाठलाग केला. मात्र त्यांना पकडण्यात अपयश आले. हिवरसिंगा परिसरात चोरट्यांनी पळ काढल्याने शिरूर ठाण्याचे एपीआय महेश टाक यांनी या परिसरात शोध मोहीम राबवली.  त्यांच्याही हाती काही लागले नाही. तिकडे अंमळनेर पोलिसांनाही सतर्क करण्यात आले होते. 

 

कर्मचाऱ्यांचा अभिमान  
या मोहिमेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सायंकाळी   पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सत्कार केला.  जांबाज पोलिस कर्मचाऱ्यांचा प्रमुख असल्याचा अभिमान असल्याचे श्रीधर म्हणाले. आयजी मिलिंद भारंबे यांनीही या कर्मचाऱ्यांचे कौतुक केेेले. 

 

हल्ल्याचा प्रयत्न  
दरम्यान, राजुरीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चोरट्यांनी बीड ग्रामीण पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. तर त्यानंतर सकाळी एलसीबी पथकाने त्यांचा शोध घेतल्यानंतर त्यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला.

 

५८ वर्षीय रशीद खान ठरले हीरो  

या  कारवाईत बीड ग्रामीण ठाण्याचे ५८ वर्षीय वाहन चालक एएसआय रशीद खान हीरो ठरले. राजुरीत एटीएम फोडल्यानंतर चोरटे पळून जाण्याची शक्यता पाहता खान  यांनी थेट त्यांच्या वाहनालाच धडक देऊन त्यांना रोखल्याने त्यांना पकडणे शक्य झाले. जिवाची पर्वा न करता शेख यांनी हे धाडस केले. यापूर्वी एटीएस पथकात त्यांनी काम केले  असल्याने त्यांचा अनुभव कामी आला.  

 

पुढील स्लाईडवर पहा,....  संबंधित छायाचित्र....

 

 

बातम्या आणखी आहेत...