आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना जिल्ह्यातील पाच हजार 310 बालकांना आणले शालेय प्रवाहात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - ऊसतोड, वीटभट्टीवर काम तर कुठे गावोगावी भटकंती करतच आयुष्य घालवणारे आई-वडील हे ठिकठिकाणचे चित्र. दोन वेळची भ्रांत असल्यामुळे मुलांचे शिक्षण हा विषय त्यांच्यासाठी दुय्यम! यामुळे ज्या वयात हातात पाटी, लेखणी यायची त्या वयात मुलांना काेयता, फावडे-टोपले घ्यावे लागले. शाळेतील पटावर नोंद असतानासुद्धा ही मुले शाळेला अर्धवेळ तर कधी पूर्णवेळ दांडी मारू लागली. यातूनच शाळाबाह्य मुलांची संख्या वाढली व अनेक मुले बालकामगार झाले. हे चित्र पालटण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण (पुणे) व युनिसेफने बालरक्षक एक माणुसकीची चळवळ हाती घेतली असून बालरक्षकांच्या मदतीने राज्यातील ७ हजार ३४९ बालकांना शालेय प्रवाहात आणले. याची ३ मिनिटांची यशोगाथा लघुपटाद्वारे तयार करण्यात येत असून त्याचे शूटिंग जालना जिल्ह्यात झाले आहे.   


मुलांचे स्थलांतर थांबवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक व ग्रामस्थांची मदत घेण्यात आली. दरम्यान, शाळाबाह्य, स्थलांतर, अनियमित विरहित महाराष्ट्र करून १०० टक्के मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी लोकसहभाग मिळावा, यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत. मंठा तालुक्यातील श्रीराम तांडा येथील शाळा, वाटूर येथील पाल ज्याठिकाणी मध्य प्रदेश तसेच जाफराबाद व देऊळगाव राजा येथील लोक येऊन राहतात. यातील काही जण दागिने बनवून विकतात तर काही भविष्य सांगतात. हिवरखेडा येथील रात्र अभ्यासिका, कानफोडीत सुरू असलेला जीवन कौशल्य कार्यक्रम, जालना शहरातील कै. यशवंतराव चव्हाण सभागृहातील बालरक्षकांची बैठक व प्रशिक्षण, सिरसवाडी रोडवर वीटभट्टीवर काम करणारे कामगार व त्यांच्या शाळाबाह्य मुलांचा शोध आदी ठिकाणचे शूटिंग करण्यात आले आहे. यासाठी २८ एप्रिल रोजी पूर्वनियोजन बैठक, २९ रोजी स्थळनिश्चिती, तर १ व २ मे रोजी प्रत्यक्ष शूटिंग करण्यात आले. लवकरच हा लघुपट मानव संसाधन मंत्रालय (दिल्ली) यांच्याकडे सादर केला जाणार आहे. 


टीममध्ये यांचा समावेश  : विद्या कुलकर्णी (महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे दस्तावेज शाखा), दिग्दर्शक सौमित्र, नूतन मघाडे (सहायक कार्यक्रम अधिकारी), पांडुरंग कवाणे (शिक्षणाधिकारी प्राथमिक) रवी जोशी (उपशिक्षणाधिकारी), डॉ. प्रकाश मांटे, जयंत कुलकर्णी, सुनील मावकर, प्रफुल्ल राजे (सर्व विषय सहायक, डीआयसीपीडी, जालना), संतोष गिऱ्हे (साधन व्यक्ती), जगदीश कुडे (पहिले बालरक्षक, श्रीराम तांडा), राठोड (गटशिक्षणाधिकारी, मंठा), शिंदे (विस्तार अधिकारी, मंठा) यांनी शूटिंगसाठी परिश्रम घेतले.  


दरम्यान, शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व बालरक्षकांनी केलेल्या प्रयत्नांची नोंद लघुपटातून घेतली जाणार आहे. महाराष्ट्र विद्या प्राधिकरण (पुणे) मार्फत हा लघुपट बनवण्यात येत आहे. तसेच ११ जूनपासून प्रवेश पंधरवाडा सुरू होणार असून मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, अशी माहिती जालना येथील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पांडुरंग कवाणे यांनी दिली.   

 

बालरक्षक म्हणजे काय   
बालरक्षक म्हणजे बाल हक्कांचे, विशेष करून शिक्षण हक्क कायद्यानुसार बालकांना मिळालेल्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्काचे पुरस्कर्ते. दरम्यान, २१ हजार ६६० शिक्षक, साधन व्यक्तींनी बालरक्षक म्हणून काम करण्यासाठी नाव नोंदणी केली आहे. जिल्हास्तरीय कार्यशाळांच्या पहिल्या टप्प्यात ७०० शिक्षकांचे प्रशिक्षण झाले आहे. यांच्या माध्यमातून स्थलांतरित पालक, वंचित आणि अनियमित बालके यांना शोधून शाळेत दाखल करण्यात आले.

 

राज्यातील ७ हजार मुले शाळेत
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण (पुणे) व युनिसेफने शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये सुरू केलेल्या या लोकचळवळीमुळे बालरक्षकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ७ हजार ३४९ मुलांचे स्थलांतर थांबवून त्यांना शाळेत आणण्यात यश आले आहे. यात एकट्या जालना जिल्ह्यातील  ५ हजार ३१० मुले आहेत. हंगामी वसतिगृह सुरू न करता मुलांचे स्थलांतर थांबवणे शक्य झाले आहे.

 

पुढे काय  : इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची १०० टक्के अध्ययन निष्पत्तीचा परिणाम मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक लोकचळवळ राबवण्यात येणार आहे. वर्ष २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात हे नियोजन आहे.   

बातम्या आणखी आहेत...