आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाच्या पुढाकारातून पाटोद्यात 72 वर्षांपूर्वी साजरा झाला हाेता बाबासाहेबांचा वाढदिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- बीड जिल्ह्यात ७२ वर्षांपूर्वी पाटोदा येथे एका शिक्षकाच्या पुढाकारातून १४ एप्रिल १९४६ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. चावडीतून त्यांच्या प्रतिमेची मिरवणूकही काढण्यात आली होती. पुढे मुंबईत वाढदिवस हा शब्द जयंती म्हणून रूढ झाल्यानंतर गेवराई तालुक्यातील मादळमोही, तर आष्टी येथील चावडीसमोर निळे झेंडे लावून वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला होता. 


पाटोदा येथील मूळ रहिवासी असलेले शिक्षक सोपानराव मुराजी जावळे व गणपतराव जावळे यांच्या पुढाकारातून १४ एप्रिल १९४६ मध्ये पाटोद्यातील चावडीसमोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून नारळ फोडण्यात आला. त्यानंतर वस्तीतून प्रतिमेची मिरवणूकही काढण्यात आली होती. यात बन्सीधर जावळे, पांडुरंग जावळे, बळीराम जावळे हे सहभागी झाले होते. पाटोदा येथील सोपानराव जावळे हे पहिले प्रशिक्षित शिक्षक. त्यांचे जामखेड व खर्डा येथे शिक्षण झाले. १९३७ मध्ये बाबासाहेबांच्या मजूर पक्षाच्या वतीने मुंबई विधान मंडळ (विधानसभा) कर्जत मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दादासाहेब रोहम यांच्या प्रचारासाठी जावळे हे विद्यार्थिदशेतच गेले होते. सोपानराव जावळे हे पुढे शिक्षक म्हणून मादळमोही येथे नोकरीला लागले. तेव्हा १९५३ मध्ये मादळमोहीत व आष्टी येथे चावडीसमोर निळे झेंडे लावून बाबासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. हा उल्लेख सोपानराव जावळे यांच्या रोजनिशीत आजही वाचायला मिळतो, अशी माहिती बीड येथील सेवानिवृत्त सहायक नोंदणी महानिरीक्षक मधुकर जावळे यांनी दिली. विशेष म्हणजे मादळमोही येथून जावळे यांची बदली झाली तेव्हा ग्रामस्थांनी त्यांना सवाद्य निरोप दिला होता. 


बाबासाहेबांनी १९५२-५३ मध्ये भुसावळहून बीडला पाठवला कार्यकर्ता 
१९५२-५३ मध्ये मराठवाडा हा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असल्याचे पाहून डॉ. आंबेडकर यांनी मराठवाड्यात वसतिगृह काढणे, राजकीय जागृती करणे, शैक्षणिक प्रगती करणे या कामांसाठी भुसावळ येथील कार्यकर्ते बाबूराव अारक यांना मुद्दाम बीड जिल्ह्यात पाठवले होते. त्यांनी अंबाजोगाई येथे खासगी मदतीवर मुलांचे वसतिगृह सुरू केले होते.

 
आमदार माधवराव सवाई आले संपर्कात 
बीड शहरातील माळीवेस येथे १९०६ मध्ये जन्मलेले माधवराव सीताराम सवाई हे नांदेड जिल्ह्यातील कंधार मतदारसंघातून काँग्रेसचे हैदराबाद स्टेटचे आमदार होते. १९५२ मध्ये सवाई यांचा डॉ. आंबेडकर यांच्याशी संपर्क आला होता. हैदराबाद महाराष्ट्र दलित जाती संघाचे ते अध्यक्षही होते. १९३८ मध्ये पुढे असहकार चळवळीतही ते सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...