आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुड्या बापाने रेल्वे स्टेशनवर सोडलेल्या तीन भावंडांना शिक्षक दांपत्याने दिली मायेची ऊब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- आईने दुसरे लग्न केले, दारूड्या बापाने रेल्वेस्टेशनवर नेऊन सोडले.  खेळण्या बागडण्याच्या वयातच आई बापांनी सोडून दिल्याने तीन भावंडांनी खडकी  रेल्वेस्टेशनवर तीन महिने भीक मागून परिस्थितीशी संघर्ष केला. वर्षभरापूर्वी या भावंडांना बीड जिल्ह्यातील मातोरी येथील शिक्षक दाम्पत्याने  त्यांचे पालकत्व घेतले. 


काही वर्षापूर्वी पुण्यात कुटुंबाचा विरोध डावलून प्रियकर प्रेयसीने आंतरजातीय विवाह केला. पुढे त्यांना एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन अपत्ये झाली.  पुढे रिक्षा चालवणाऱ्या तरुणाला दारूचे व्यसन जडल्याने  घरात वाद वाढले. त्यामुळे पत्नीने तीन मुलांना सोडून दुसरे लग्न केले.    तर पती तीन मुलांना  पुण्याच्या   खडकी रेल्वेस्टेशनवर सोडून निघून गेला.  खडकी स्टेशनवर प्रदीप समजीसकर (१४) दिव्या समजीसकर (१२) व जान्हवी समजीसकर ही तिघे भावंडे   उघड्यावरच तीन महिने राहिले.   रेल्वे स्टेशनवर भीक मागणे व रात्री ओव्हरब्रिजच्या फुटपाथवर  झोपणे असा त्यांचानित्यक्रम होता.   खडकी रेल्वेस्टेशनवर ही भावंडे  पोलिसांना  आढळल्याने पोलिसांनी पुण्यातील स्माईल प्लस सोशल फाऊंडेशनचे   योगेश मालखरे यांना  बोलावून घेतले. मालखरेंनी प्रदीपला  आळंदीच्या ओम शांती बालकाश्रमात तर दिव्या व जान्हवीला आळंदीच्या स्वाधार महिला बाल केंद्रात ठेवले.   सोशल मीडियातून मित्र झालेले मातोरी येथील साहेबराव पाटील विद्यालय तांदळा येथील शिक्षक धर्मराज जरांगे  यांना मालखरे यांनी फोन करून या अनाथ मुलांचा सांभाळ  करा, अशी विनंती केली.   १५ डिसेंबर २०१६ रोजी जरांगे आळंदीला गेले. त्यांनी  तिन्ही मुलांना  घरी आणले.   ही मुले  शिरूर तालुक्यातील टकलेवाडी जिल्हा परिषद शाळेत  शिकत आहेत.  प्रदीप हा पाचवीत, दिव्या चौथी तर जान्हवी पहिलीत शिकत आहेत.   

 

प्रदीपची बोटे थिरकताहेत  तबल्यावर
प्रदीप समजीसकर हा सध्या मातोरी येथील भालकेश्वर मतिमंद शाळेत राहून येथील  सहशिक्षक वैभव राजपूत यांच्याकडून  तबल्याचे धडे घेत आहे. सध्या तबल्याचे तीन बोल शिकलेला प्रदीप पुढे संगीत विशारद होईल, हे नक्की आहे.

 

दिव्याच्या पायाचे ऑपरेशन करणार
 दिव्या हीस अर्धांगवायू असून  एका पायाने व डोळ्याने ती दिव्यांग आहे. तिची शिकण्याची मोठी जिद्द आहे. माझ्यासमोर आर्थिक अडचण असली तरी तिच्या पायाचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.
- धर्मराज जरांगे, शिक्षक

बातम्या आणखी आहेत...