आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी अधिकाऱ्यांनी घेतला विशेष कॅम्प; माजी सैनिकांच्‍या कुटुंबीयांना दिली नवीन योजनांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अहमदनगर येथील लष्करी अधिकाऱ्यांनी रविवार आणि सोमवारी लातूरमध्ये येऊन विशेष कॅम्प घेतला. ब्रिगेडियर विक्रांत नायर यांची या वेळी विशेष उपस्थिती होती. 

  
लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात अहमदनगर आर्मड क्रॉर्प्स व स्कूलद्वारे राज्य सरकार व जिल्हा सैनिक बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांसाठी  हा विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला होता. कर्नल सुखेश वर्मा, सुखविंदर सिंग, अतिरिक्त पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भरत सासणे, माजी मेजर एम.बी. पटवारी उपस्थित होते. या वेळी ब्रिगेडियर नायर म्हणाले की, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांशी सातत्याने संपर्कात राहून त्यांना नवीन शासकीय योजनांची माहिती देऊन लाभ मिळावा यासाठी सैन्यदल प्रयत्नशील आहे. तसेच हा लाभ त्यांना वेळेत मिळण्यासाठी माजी सैनिकांकडून त्यांची संपूर्ण माहिती या कॅम्पमध्ये फॉर्मद्वारे भरून घेण्यात आली. ही माहिती जवळच्या कोणत्याही आर्मी मुख्यालयास पाठवावी, असे 
त्यांनी सांगितले.   


माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण माहितीचा ‘डेटा बँक’ सैन्य दलाकडे तयार झाल्यास या सर्वांना नवीन योजनांचा लाभ तत्काळ मिळणे सुलभ होणार असल्याची माहिती ब्रिगेडियर श्री. नायर यांनी दिली. या कॅम्पमध्ये सैन्य दलाकडून माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या पेन्शन, जमीन व कायदेबाबतचे वाद, अभिलेख, आरोग्य व इतर सर्व प्रकारच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील माजी सैनिक, शहीद जवानांच्या वीर पत्नी व त्यांच्या कुटुंबीयांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी जिल्हा क्रीडा संकुलात आरोग्य शिबिरही घेण्यात आले. त्यामध्ये डोळे तपासणी, दंत तपासणी करण्यात आली. पेन्शन योजनेबाबतच्या सर्व तक्रारींचे निरसन येथे करण्यात येणार असून त्याकरिता स्वतंत्र युनिट काम करीत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील सातशे ते आठशे माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...