आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीच्या बाचाबाचीनंतर टोळक्याने सकाळी नगरसेवकावर केला हल्ला, अंबाजोगाईतील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - रविवारी रात्री  बिअर बारवर  तरुणांतील भांडण सोडवताना त्यांच्याशी बाचाबाची झाली. त्याच तरुणांनी  सोमवारी सकाळी अकरा वाजता बिअर बार व हॉटेलचे मालक असलेले अंबाजोगाई येथील नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य कमलाकर कोपले यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.   भाजप नगरसेविकेच्या घरी आमदारांना भेटण्यासाठी आल्याची संधी साधून   हल्लेखोरांनी कोपले यांच्यावर  लाकडी दांडा, गजाने  बेदम मारहाण केली.  तर कोपले यांच्या बचावासाठी  गेलेल्या नगरसेविकेचा  पतीही जखमी झाला आहे. भाजपचे दोन्ही आमदार नगरसेविकेच्या घरी भेट देऊन परतल्यानंतर हा हल्ल्याचा प्रकार घडला.  


येथील नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक कमलाकर कोपले यांचे अंबा कारखाना परिसरात बिअर बार व हॉटेल आहे.  रविवारी रात्री   अकरा वाजता या बारवर दारू पिण्यासाठी गेलेल्या सात तरुणांचे आपसात भांडण लागले.  या भांडणात हॉटेलची नासधूस होऊ लागल्याने हॉटेल मॅनेजरने त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मद्यधुंद तरुण शेख बशीर शेख शब्बीर , शेख आजीम शेख वजीर, रा.चनई ता.अंबाजोगाई , शेख बिलाल चाऊस रा. सदर बाजार  या तिघांनी   मॅनेजर सोपान सुरवसे  यांना मारहाण केली. यात ते   जखमी झाल्याने त्यांना स्वाराती रुग्णालयात  दाखल करण्यात आले.  हॉटेल मालक  असलेले नगरसेवक कमलाकर कोपले हे रात्री हॉटेलवर  गेले असता त्यांची  या तरुणांशी  बाचाबाची झाली.   या प्रकरणी ग्रामीण  पोलिस ठाण्यात तक्रार दाखल देण्यात आली.


राग मनात धरून हल्ला : रात्री बारवर झालेल्या बाचाबाचीचा राग मनात धरून ते सात तरुण  सोमवारी सकाळपासून कोपले यांच्या मागावर होते. नगरसेविका  संगीता काळे यांच्या निवासस्थानी  भाजपचे आमदार आर.टी.देशमुख व आमदार संगीता ठोंबरे या आल्याने  नगरसेवक कमलाकर कोपले त्यांना भेटण्यासाठी  काळे यांच्या घरी गेले होते.  दोन चार चाकी  वाहनांतून हे तरुणही तेथे पोहोचले. आ. देशमुख आणि ठोंबरे तेथून जाताच त्यांनी कोपले यांना  लाकडी दांडे व गजाने  मारहाण केली. त्यांच्या बचावासाठी  गेलेल्या दिलीप काळे यांनाही तरुणांनी मारहाण केली.  कोपले यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

दोन्ही आमदार निघून जाताच हल्लेखोरांनी  साधली संधी
सोमवारी सकाळी  अकरा वाजता माजलगावचे आमदार आर.टी.देशमुख,  केजच्या आ.संगीता ठोंबरे या  खासगी कामासाठी अंबाजोगाईत आल्या होत्या.  काम आटोपल्यानंतर ते नगरसेविका संगीता काळे यांच्या घरी चहापानासाठी गेले होते. चहापानानंतर ते निघून गेल्याची संधी साधत हल्लेखोरांनी कोपले यांच्यावर हल्ला केला.

 

सीसीटीव्ही  कॅमेऱ्यात हल्लेखोर झाले कैद
कोपले यांच्यावर  पंधरा ते २० तरुणांनी हल्ला  केला असून  भाजप नगरसेविका संगीता  काळे  यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही  कॅमेऱ्यात हल्लेखोर कैद झाले आहेत.  तपासात पोलिसांना हे फुटेज महत्त्वाचे ठरणार आहे .

 

हल्लेखोरांच्या अटकेच्या सूचना
या हल्ल्याची माहिती मिळताच आ.संगीता ठोंबरे यांनी स्वारातीत येऊन कोपले यांच्या प्रकृतीची विचारपूस करत पोलिसांना हल्लेखोरांना लवकर अटक करण्याची सूचना केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.  जखमी कोपलेंच्या जबाबानंतरच गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

बातम्या आणखी आहेत...