आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी - जिंतूर शहरातील परभणी रस्त्यावरील सर्व्हे नंबर १२५।१ मधील प्लाॅट क्रमांक १६ ची मूळ मालकाच्या गैरहजेरीत बनावट कागदपत्रे तयार करून तो विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह सात जणांवर सोमवारी (दि.१५) गुन्हा दाखल करण्यात आला. परभणीतील व्यापारी सुरेंद्रकुमार बांठिया यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
श्री बांठिया यांनी फिर्यादीत म्हटले की, ९ डिसेंबर २०१३ रोजी वसंत त्रिंबकराव पुराणिक यांच्याकडून एक लाख १५ हजार रुपयांत तो प्लॉट खरेदी केला होता. श्री पुराणिक यांनी हा प्लॉट मुळाबाई अच्छा यांच्याकडून १९८७ मध्ये खरेदी केला होता. पुराणिक यांच्याकडून प्लॉट खरेदी केल्यानंतर बांठिया यांनी याबाबतची नोंद पालिकेत केली होती व त्या मालमत्तेची रीतसर नोंदही पालिकेने मालमत्ता वहीत केली आहे. १८ डिसेंबर २०१७ रोजी बांठिया यांना त्या जागेच्या नमुना क्रमांक ४३ ची गरज पडल्याने ते जिंतूरच्या पालिकेत गेले असता त्यांना नोटीस बोर्डावर एक जाहीर प्रगटन लावलेले दिसले. ते त्यांनी बारकाईने वाचले असता सदरील मिळकतीचे वर्णन त्यांच्या मिळकतीशी जुळते असल्याचे दिसून आले. त्यावर त्यांनी चौकशी केली असता खुशाल प्रल्हादराव घुगे यांनी तुकाराम इंदर लहाने (रा.तळतोडी, जि.जालना) यांच्याकडून २०१७ मध्ये तो प्लाॅट खरेदी केला आहे. वसंत पुराणिक यांनी ४ फेब्रुवारी १९८७ च्या खरेदी खतानुसार स्वतः च्या नावाने करून घेऊन तो तुकाराम इंदर लहाने यांना हस्तांतरित केल्याचे दिसून आले. या जागेची वसंत पुराणिक यांनी २०१३ मध्ये श्री बांठिया यांना विक्री केली असतानाही पुन्हा जुन्या खरेदी खत आधारे त्याचे नामांतर करून पुन्हा तीच जागा विकण्याचा प्रकार केला.
पालिका कर्मचारी हाताशी
या विक्रीस पालिकेतील तत्कालीन नामांतर, अभिलेख विभाग व कर विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून व तुकाराम इंदर लहाने, सिराजोद्दीन सिद्दीकी, नागेश कुलकर्णीं, खुशाल घुगे, नागेश बडे, रामचंद्र डोंबे या सर्वांनी बनावट कागदपत्रे तयार करून तो विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. त्यावरून बांठिया यांनी याबाबत पालिकेत अर्ज देऊन सदरील जागेचे हस्तांतरण थांबवण्याची मागणी केली आहे.
बांठिया यांना धमकावले
बांठिया यांनी पालिकेत नामांतर करू नये, म्हणून अर्ज दिल्याचे माहीत पडताच ८ जानेवारीला संध्याकाळी सातच्या सुमारास बांठिया हे त्या प्लॉटवर त्यांचा मित्र शर्मा यांच्या सोबत उभे असताना वसंत पुराणिक, इंदर लहाने, सिराजोद्दीन सिद्दीकी, नागेश कुलकर्णीं, खुशाल घुगे, नागेश बडे, रामचंद्र डोंबे आदींनी त्यांना पालिकेत दिलेला अर्ज मागे घेण्यासाठी धमकावत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे श्री बांठिया यांनी फिर्यादीत म्हटल्यावरून सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे, फौजदार सुरेश नरवाडे हे पुढील तपास करीत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.