आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुजलेल्या खदानींवर अतिक्रमणधारकांचे लक्ष; मनपाकडून खदानी बुजवणे सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- शहराच्या जुन्या भागासह नव्या भागातही असलेल्या काही खदानी बुजविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून शहरात तयार होत असलेल्या सर्वात मोठ्या सिमेंट रस्त्याची माती या खदानींत टाकून भर घालण्याचे काम सुरु केले आहे. मात्र, या बुजलेल्या खदानींवर मनपाच्या पदाधिकारी, नगरसेवकांसह अतिक्रमणधारकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.    


दरम्यान, बुजलेल्या खदानींचा वापर महापालिकेने करावा, त्यावर अतिक्रमणे होऊ देऊ नयेत, अशी मागणी काही नगरसेवकांनी मनपा आयुक्त राहुल रेखावार यांच्याकडे केली आहे. नुकत्याच झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेतही हा विषय लावून धरण्यात आला आहे. 

  
शहरातील जुन्या भागातील फिरोज टॉकीज परिसर, जिंतूर रस्त्याजवळील वैकुंठधाम स्मशानभूमी व कारेगाव रस्त्यावरील संत गाडगेबाबानगर या तीन मोठ्या खदानी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या या खदानी आहेत. मात्र, शहराच्या वाढत्या विस्तारात या खदानीवर काहींचे लक्ष केंद्रित झाले. मध्यवर्ती भागात जमिनीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने या खदानींत भर घालून त्यावर पद्धतशीरपणे अतिक्रमणे करण्याचे सत्र सुरु झाले. प्रामुख्याने फिरोज टॉकीज परिसरातील खदान तर सर्वात मोठी होती. पाण्याचे तळेच अशी या खदानीची ओळख होती. मात्र, या खदानीत हळूहळू भर घालत तिच्या चहूबाजूंनी अतिक्रमणे वाढत गेली. महापालिकेने ग्रँड कॉर्नरवरील या खदानीवरील अतिक्रमणे चार वर्षांपूर्वी काढल्यानंतरही पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. उलट पूर्वीच्या अतिक्रमणांत भर घातली गेली आहे. संत गाडगेबाबानगर या निवासी वसाहतीतील खदानही हळूहळू भरत गेली. वैकुंठधाम खदानीचीही अशीच अवस्था आहे.    
सदुपयोग व्हावा : मनपाने खदानी भरल्यास हरकत नाही, परंतु त्या जागांचा चांगल्या कामांसाठी मनपानेच उपयोग करावा. अन्यथा, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हितसंबंधातून अतिक्रमणेच वाढण्याची शक्यता आहे.

 

आयुक्तांचा पुढाकार...   
शहरातील तयार करण्यात येत असल्याचे रस्त्याच्या खालील माती या खदानीत टाकण्यासाठी आयुक्त राहुल रेखावार यांनी पुढाकार घेतल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वकपणे फिरोज टॉकीज परिसरातील खदानीतच भर घालण्यासाठी पुढाकार घेतला. मुळातच, यापूर्वी भरल्या गेलेल्या या खदानीवर अतिक्रमणे आहेत. तिचा आणखी भाग भरला गेल्यास अतिक्रमणांसाठी फुकटचेच कुरण ठरणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...