आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महारॅलीत 32 शाळांचे विद्यार्थी सहभागी; बीड जिल्हा व्यसनमुक्तीची दिली हाक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- “हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, खाणार नाही गुटखा, पिणार नाही बिअर, धूम्रपान मद्यपान, आयुष्याची धूळधाण... घ्याल तंबाखूची साथ, आयुष्य होईल बरबाद... होत आहे उद्ध्वस्त आमची तरुण मंडळी, नशेच्या चक्रात गुंतली जी सगळी..’अशा गगनभेदी  घोषणांनी शनिवारी सकाळी कडाक्याच्या थंडीत बीड शहर दणाणले.  नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच व्यसनमुक्तीसाठी निघालेल्या महारॅलीत ३२ शाळांच्या पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभागी होत जिल्हा व्यसनमुक्तीची हाक दिली. नगर रोडवरील सामाजिक न्याय भवनात या महारॅलीचे रूपांतर कार्यक्रमात झाले. राष्ट्रगीताने  कार्यक्रमाचा समारोप झाला. या वेळी शिवसंग्रामसह राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी स्वच्छता करून नवा संदेश दिला.    


मराठवाडा लोकविकास मंच, सामाजिक न्याय विभाग व कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी सकाळी साडेआठ वाजता व्यसनमुक्ती महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज  जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर  विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. सकाळी  ९ वाजता  आ. विनायक मेटे, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर,  सीईओ धनराज नीला, राजेंद्र मस्के, संपादक विजयराज बंब यांनी हिरवी झेंडी दाखवली.


आज रात्री संगीत रजनीचा कार्यक्रम    
व्यसनमुक्ती अभियानांतर्गत ३१ डिसेंबर रोजी रात्री ७ ते १२ या वेळेत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानावर  प्रसिद्ध  अभिनेते, गायक, गायिका, कलाकार यांच्या उपस्थितीत  संगीत रजनीचा कार्यक्रम  होईल. या वेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, पोलिस आयुक्त मिलिंद भापकर, आमदार विनायक मेटे, जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, सीईओ धनराज नीला उपस्थित राहतील.


खाणार नाही गुटखा, पिणार नाही बिअर ...    
सामाजिक न्याय भवनाच्या परिसरात महारॅली पोहचली तेव्हा प्राचार्या सविता शेटे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाच्या दुष्परिणामांची माहिती देत व्यसनाने माणूस विवेकशून्य बनतो याची जाणीव करून दिली. आजकाल कुटुंबात पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक ताण आहे. परंतु स्त्री व्यसनाच्या आहारी जात नाही.  प्रत्येक पुरुषाने व्यसनमुक्त झाले पाहिजे, असे आवाहन केले. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, खाणार नाही गुटखा , पिणार नाही बिअर अशा घोषणा म्हणून घेतल्या.


सामाजिक न्याय भवनात समारोप
बीड शहरातील  सुभाष रोड, माळी वेस, बलभीम चौक, कारंजा, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर रोडमार्गे ही व्यसनमुक्ती महारॅली  सामाजिक न्याय  भवनातील  परिसरात सकाळी सव्वादहा वाजता पोहोचली. समारोपप्रसंगी  आमदार मेटे यांच्यासह युवक शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, कल्याण आखाडे,  जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, विजयराज बंब, जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा, प्राचार्या सविता शेटे, नगरसेवक इद्रिस हाश्मी, जगदीश गुरखुदे, कल्याण आखाडे, शांतीलाल पटेल, बालरोगतज्ज्ञ डॉ. सुभाष जोशी, संतोष सोहनी, मंगेश लोळगे, शांतीलाल पटेल, पत्रकार वसंत मुंडे, संतोष मानूरकर,  प्राथमिक शिक्षणाधिकारी भावना राजनोर,  भगवान सोनवणे, अशोक लोढा आदी उपस्थित होते.


जिल्ह्यातून व्यसनाला  हद्दपार करू :  आ. मेटे    
बीड जिल्ह्यात व्यसनाचे मोठे प्रमाण असून ही एक शरमेची बाब आहे. व्यसनाच्या विरोधात  लढा उभा करणे गरजेचे आहे.  आपल्या घरी जर कोणी व्यसन करत असेल तर त्याला व्यसनमुक्त करण्याचा संकल्प आपण नवीन वर्षाच्या निमित्ताने केला पाहिजे. आपला भाऊ, वडील यांना जर कोणी दारुडे म्हटले तर चालेल का ? या जिल्ह्यातून व्यसनाला हद्दपार करू. येणाऱ्या काळात सर्व सामाजिक संघटना, विविध पक्षांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून या चळवळीत सहभागी होण्याची गरज आहे.


राज्य सरकारकडूनच मिळतेय पाठबळ    
आपण काय बोलतो त्यापेक्षा आपण काय करतो याला महत्त्व आहे. भारत हा युवकांचा देश असून  युवा पिढी  व्यसनाच्या आहारी जात आहे. मोबाइलवरही तरुण सतत दिसत असल्याने हे व्यसनसुद्धा सुटणे गरजेचे आहे. सरकारने  थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत दारू दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी दिल्याने व्यसनाधीनतेला पाठबळ मिळत आहे.  त्याला थारा देऊ नका.   
- सुभाष जोशी, बालरोगतज्ज्ञ बीड 

बातम्या आणखी आहेत...