आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाेडेबाजार टाळण्यासाठी भाजप 'दक्ष', नगरसेवक सहलीला; अमित देशमुखांकडून निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर शहर महापालिकेतील भाजपचे नगरसेवक, नगरसेविका आणि त्यांचे पती किंवा मुलगा अशी मंडळी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहलीवर रवाना झाली आहे. पुणे येथे अभ्यास दौऱ्यावर गेल्याचा दावा भाजपच्या मंडळींनी केला असला तरी या नगरसेवकांचा मुक्काम गोव्यातील एका रिसाॅर्टवर असणार असल्याची माहिती आहे. मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान, नगरसेवक सहलीवर जात असतानाचे चित्रीकरण केल्यावरून एका स्थानिक पोर्टलच्या पत्रकारास भाजपच्या कार्यकर्त्यांनी अवमानास्पद वागणूक दिली आहे. याचा काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्यासह अनेकांनी निषेध केला. 

 
लातूर-बीड-उस्मानाबाद विधान परिषदेची निवडणुकीत भाजपच्या सुरेश धस यांच्याविरोधात राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले अशोक जगदाळे हे तयारीने मैदानात उतरले आहेत. 
त्यामुळे कोणताही दगाफटका होऊ नये या काळजीपोटी भाजपने लातूर महापालिकेच्या नगरसेवकांना बुधवारी सहलीवर पाठवले.  दोन एसी ट्रॅव्हल्समधून गेलेली ही मंडळी निवडणुकीत मतदान कसे करायचे यासंबंधीचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेल्याचा दावा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी केला. मात्र ही सगळी मंडळी गोव्यात एका रिसाॅर्टवर मुक्कामाला राहणार असल्याची माहिती आहे. परंतु याला दुजोरा मिळू शकला नाही.

 

या सहलीचा खर्च आपणच करीत असल्याचे लाहोटी यांनी सांगितले. दरम्यान, ३६ नगरसेवक, त्यातील महिला नगरसेवकांची मुले, पती किंवा मुलगा अशी मंडळी या सहलीवर गेली. पत्रकारांना याची कुणकुण लागलीच.  बुधवारी राजा नारायणलाल लाहोटी शाळेच्या मैदानात एकत्र जमून तेथून निघण्याचे नियोजन करण्यात आले होते. याचे चित्रीकरण करण्यास मज्जाव करीत पत्रकाराला दमदाटी करून त्याला बाहेर काढण्यात आले. निवडणूक आयोग, प्रेस कौन्सिल, अधिस्वीकृती समिती व मानवी हक्क आयोगाकडे चित्रीकरणासह तक्रार करणार असल्याचेही संबंधित पत्रकाराने सांगितले.

 

अमित देशमुखांकडून निषेध   
आज लातूर या स्थानिक पोर्टलचे पत्रकार रवींद्र जगताप यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी अपमानकारक वागणूक दिल्याच्या प्रकाराचा  आमदार अमित  देशमुख यांनी निषेध केला.  शहरात विविध भागात कचरा, पाणी पुरवठा, पथदिवे यासंदर्भाने अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या असताना महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी,नगरसेवक सहलीवर जाणे हा बातमीचा  विषय आहे. तो लोकांपर्यंत पोहाेचवण्याचे घटनादत्त काम करणाऱ्या पत्रकारांशी भाजप पदाधिकाऱ्यांनी असभ्य वर्तन केले, हा प्रकार गंभीर असून तो निषेधार्ह असल्याचे आमदार देशमुख म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...