आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली: संततधार पावसामुळे कयाधू नदीवरील पूल वाहून गेला; 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील समगा भागातील कयाधू नदीवरील पूल शनिवारी रात्री वाहून गेला. त्यामुळे समगा व त्यापुढील दहा ते पंधरा गावांचा हिंगोलीशी संपर्क तुटला अाहे. हिंगोलीचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी वाहून गेलेल्या पुलाची पाहणी करून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला पुलाची डागडुजीबरोबरच सदरील रस्ता ताबडतोब दुरुस्त करण्याच्या लेखी सूचना केल्या आहेत. 


कयाधू नदीच्या लाभक्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सर्वसाधारण ते चांगल्या दर्जाचा पाऊस सुरू होता. या पावसामुळे कयाधू नदीला शनिवारी रात्री चांगलेच पाणी आले. तर समगा भागात कयाधू नदी दुथडी भरून वाहत असल्याने समगा ते हिंगोली मार्गावर असणारा पूल एका बाजूने पूर्णता वाहून गेला. त्यामुळे या भागातील गावांचा हिंगोलीशी असलेला संपर्क रविवारी सकाळपासून एका बाजूने पूर्णपणे तुटला आहे. याबाबत हिंगोलीचे तहसीलदार गजानन शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी सकाळी ८ वाजता घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त पुलाची पाहणी केली. 

 
पूल दुरुस्तीच्या सूचना 
हा पूल जिल्हा परिषदेच्या निधीतून झाला असल्याने तहसीलदार शिंदे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला लेखी पत्र देऊन आणि अभियंत्यांना फोनवर संपर्क साधून पुलाची दुरुस्ती शक्य तितक्या लवकर करण्याच्या सूचना केल्या. समगा येथील कयाधू नदीवरील पूल वाहून गेल्याने समगा आणि त्यापुढील येडूद, माळ धामणी, दुर्ग धामणी, कंजारा, खेड आदी गावांसह दहा ते पंधरा गावांचा हिंगोलीशी संपर्क तुटला आहे. 

बातम्या आणखी आहेत...