आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली-परभणी रस्त्यावर बस-कारचा अपघात; 30 जखमी, 15 गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - औंढा नागनाथ - परभणी रस्त्यावर बाराशिव हनुमान पाटीजवळ  शनिवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पुसद - परभणी या मानव विकास मिशनच्या बसची आणि भरधाव मारुती वॅगन आर कारची समोरासमोर धडक होऊन सुमारे ३० प्रवासी जखमी झाले असून त्यातील १० ते १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात एवढा भीषण होता की बस हवेत उडून रस्त्यावर उलटी उभी राहिली. कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला असून त्यातील ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.  


हिंगोली- परभणी रस्त्यावर औंढा नागनाथ तालुक्यातील बाराशिव हनुमान पाटीपासून सुमारे ३ किमी अंतरावर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुसद येथून परभणीकडे जाणारी मानव विकास मिशनची बस (एमएच ०७- ९४३८) आणि औरंगाबादकडे जाणारी मारुती वॅगन आर कारची (एमएच २० ईई ०२६१) समोरासमोर धडक झाली.  या अपघातात सुमारे ३० प्रवासी जखमी झाले असून त्यातील १० ते १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, तर कारमधील जखमी हे औरंगाबाद येथील असून ते वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथून औंढा नागनाथ मार्गे औरंगाबादकडे जात होते. त्यातील संकेत करजगे, सखाराम करजगे, कल्पना करजगे आणि तीन लहान मुले असे एकूण सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

अपघाताची माहिती कळताच हट्टा पोलिस ठाण्याचे पीआय सुनील नाईक व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. अपघात झाला त्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार कारची गती एवढी होती की तिच्या एका धडकेत बसगाडी हवेत उसळून रस्त्यावर उलटी होऊन आदळली, तर कारचा समोरील भाग पूर्णतः चेंदामेंदा झाला आहे. अपघातानंतर बस आणि कारमधील सर्वच जखमी प्रवाशांना परभणी व नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्यामुळे बसमधील जखमींची नावे समजू शकली नाहीत.

बातम्या आणखी आहेत...