आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगड फेकून कार थांबवली; कार मालकाला भोसकून ठार केले, चालकाला बेदम मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थळाचा पंचनामा करताना पाचोड पोलिस ठाण्यातील कर्मचारी व अधिकारी. - Divya Marathi
घटनास्थळाचा पंचनामा करताना पाचोड पोलिस ठाण्यातील कर्मचारी व अधिकारी.

पैठण/पाचोड - परळी येथून औरंगाबादकडे निघालेल्या कारवर दगड फेकल्याने चालक आणि त्याच्यापाठोपाठ मालक कारमधून खाली उतरले. हीच संधी साधून दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी “तुम्हारे पास क्या क्या है जल्दी निकाल के दे दो’ असे धमकावले, परंतु  प्रतिकार करताच दरोडेखोरांनी धारदार शस्त्र आणि काठीने मारहाण करून कारमालकाकडील सोन्याची चेन, नगदी रोकड असा सुमारे दीड लाखांचा ऐवज लुटून पलायन केले.

 

दरोडेखोरांच्या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कारमालकाचा रुग्णालयात पोहोचेपर्यंत मृत्यू झाला तर  कारचालकावर  उपचार सुरू आहेत. ही थरारक घटना सोमवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभरूळ (ता.पैठण) शिवारात घडली.   सिद्धलिंग रामलिंग कोरे (५५, रा. सिडको एन ३, औरंगाबाद) असे मृत व्यक्तीचे नाव असून सुनील प्रभाकर सुरडकर (३५, रा. जाधववाडी, औरंगाबाद) असे जखमी कारचालकाचे नाव आहे.   


पुणे येथील बी.एम.पाटील ग्रुप कन्स्ट्रक्शनचे साइट इन्चार्ज सिद्धलिंग कोरे व त्यांचा चालक सुनील सुरडकर हे सोमवारी रात्री परळी येथून बीड, गेवराई, शहागडमार्गे औरंगाबादकडे कारने (क्र. एम एच १२ एच सी ३२५६) निघाले होते.  साडेनऊच्या दरम्यान त्यांनी पाचोड येथील हॉटेलवर चहा घेऊन औरंगाबादकडे निघाले. पाचोडपासून १५ कि.मी.  वर  आडूळ व दाभरूळ या गावाच्या दरम्यान असलेल्या बौद्धविहार  व महादेव मंदिराजवळ त्यांच्या कारवर दगड आदळले. त्यामुळे चालक सुनील याने कार थांबवली. कोरे आणि सुनील खाली उतरून कारची पाहणी करत असतानाच  दबा धरुन बसलेले  तीन ते  चार दरोडेखोर त्यांच्यावर धावून आले. त्यांनी कोरे आणि सुरडकर यांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. “तुम्हारे पास क्या क्या है जल्दी निकाल के दे दो’ असे म्हणत त्यांची मारहाण सुरूच होती. त्यामुळे कोरे यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्याकडील धारदार शस्त्राने कोरे यांच्या मानेवर व मांडीवर सपासप वार केले.

 

यामुळे ते जागीच कोसळले,   तर कार चालक सुनील सुरडकर हा गंभीर जखमी झाला.  दरोडेखोरांनी कोरे  यांच्या  हातातील दोन अंगठ्या, एक चेन, तीन मोबाइल व  पँटच्या खिशाच्या पाकिटातील  रोख एक हजार ९०० रुपये तर सुरडकरकडील चारशे रुपये असा एकूण  दीड लाखांचा ऐवज लुटून पळ काढला.  

 

पाच मिनिटे  प्रतिकार 

कोरे यांनी दरोडेखोरांचा पाच मिनिटे प्रतिकार केला. दरोडेखोरांनी कोरे यांच्या छातीवर चाकूचे दोन वार व पायावर एक वार केला, तर चालक सुनील सुरडकरला काठीने बेदम मारहाण केली. 

 

धडपड अयशस्वी  

दरोडेखोरांच्या मारहाणीत  गंभीर जखमी झालेला चालक सुरडकर याने स्वतःचा जीव वाचवत  कोरे यांना कारमध्ये टाकून थेट औरंगाबाद येथील सेठ नंदलाल धूत रुग्णालय गाठले. डाॅक्टरांनी   कोरे यांना तपासून मृत घोषित केले,  तर कारचालक सुरडकर याच्यावर उपचार सुरू केले.

 

पोलिसांनी केली नाकेबंदी 

उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, सपोनि महेश अांधळे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत एक कि. मी. चा परिसर पिंजून काढला.  नाकेबंदीही केली. मात्र दरोडेखोर सापडले नाही. दरोडेखोरांना समोर आणले तर आपण ओळखू, असे जखमी  सुरडकरने  सांगितले. 

 

पोलिस घटनास्थळी धावले 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, पाचोड  ठाण्यातील सहायक  पोलिस निरीक्षक महेश आंधळे,  उपनिरीक्षक गोरक्षक खरड,  कर्मचारी तात्या गोपाळघरे, रामदास राख, नुसरत शेख, शिवाजी जाधव, अनुरुद्ध राठोड, काकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

 

बातम्या आणखी आहेत...