आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांत नऊ सर्वधर्मीय स्मशानभूमींची स्वच्छता; तरुणांनी उचलला स्वच्छतेचा विडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- जात, धर्म, गट, समूह यांना तिलांजली देतानाच एकत्र आलेल्या तरुणांच्या समूहालाही काहीच नाव न देता केवळ शहराची स्वच्छता हाच हेतू ठेवून एकत्र आलेल्या सर्वधर्मीय लातूरकर तरुणांनी गेल्या दोन महिन्यांत शहरातील नऊ स्मशानभूमींची स्वच्छता केली आहे.  

 

दोन महिन्यांपासून लातूर महापालिकेने शहर स्वच्छ ठेवण्यासाठीचे पाऊल उचलले आहे. रस्ते, गल्लीबोळ स्वच्छ होत होते. एका अंत्यविधीला गेल्यानंतर तेथील घाण पाहून गोपी साठे या तरुणाला तेथील स्वच्छता करण्याची गरज वाटली. त्यांनी आपल्या मित्र, परिचितांना फोन, एसएमस, व्हाॅट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून स्मशानभूमींची अवस्था सांगितली. येत्या रविवारी मी स्वत: त्या ठिकाणची स्वच्छता करायला जातोय,  ज्यांना यायचे त्यांनी मोहिमेत सामील व्हावे असे आवाहन केले. गांधी जयंतीनिमित्त २ आॅक्टोबरला तरुणांची बैठक झाली. आॅक्टोबरच्या पहिल्या रविवारपासून मारवाडी स्मशानभूमीपासून ही मोहीम सुरू झाली. दर रविवारी नवे तरुण  सामील होऊ लागले. शहरात विविध जाती-धर्मांच्या किमान १५ स्मशानभूमी आहेत. त्यातील दहा स्मशानभूमींची स्वच्छता आतापर्यंत करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात स्मशानभूमींची स्वच्छता आणि पुढच्या टप्प्यात  चर्चेतून जी ठिकाणे समोर येतील तेथील स्वच्छता करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एकत्र आलेल्या तरुणांनी आपल्या समूहाला कोणतेही नाव दिले नाही की कुणाचे नेतृत्व नाही.  ठरल्याप्रमाणे पुढच्या रविवारी फावडे, टोपले, कुदळ, ग्लोव्हज, मास्क असे साहित्य घेऊन यायचे. 

    
वक्रतुंडच्या तरुणांनी केली स्वच्छता   
लातूर शहरातील उड्डाणपुलाखाली घाणीचे साम्राज्य पसरले होते. मात्र शहरातील वक्रतुंड गणेश मंडळाच्या तरुणांनी या परिसराची स्वच्छता केली.  उड्डाणपुलाच्या भिंतीवर सुंदर आणि बोलकी चित्रे रेखाटली.  जाहिरातींचे बॅनर, पोस्टर लाऊन घाण झालेल्या भिंतीही  धुऊन काढल्या. त्यावर आकर्षक चित्रे काढली.  या उपक्रमाची सुरुवात रविवारी सकाळी देशीकेंद्र शाळेजवळील उड्डाण फुलाखालील भिंतीवर चित्र काढून करण्यात आली. महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाणी आणि लाइटची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तरीही नाउमेद न होता मुलांनी मोबाइलच्या प्रकाशात स्वच्छता केली.

 

येथे केली स्वच्छता   
मागील ११ महिन्यांमध्ये लातूर शहरातील श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर परिसर स्मशानभूमी, नांदगाव वेस स्मशानभूमी, श्री मारवाडी स्मशानभूमी, खाडगाव रोड स्मशानभूमी, ख्रिश्चन समाज स्मशानभूमी, लिंगायत समाज स्मशानभूमी,  बेलपत्री लिंगायत समाज स्मशानभूमी, ईब्राहिमशा तकीया कब्रस्तान, शब्बीर शहावली कब्रस्तानमध्ये स्वच्छता केली. 

बातम्या आणखी आहेत...