आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ससून’च्या नावाखाली जीवनदायी योजनेतून गरिबांची आर्थिक लूट, जालन्‍यातील प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशा बनावट पावत्या छापून गरिबांची आर्थिक लूट होत असल्याचे डॉ. जोशी यांनी पोलिसांना पुरावे दिले आहेत. - Divya Marathi
अशा बनावट पावत्या छापून गरिबांची आर्थिक लूट होत असल्याचे डॉ. जोशी यांनी पोलिसांना पुरावे दिले आहेत.

जालना - दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा लाभ घेता यावा, याकरिता ३५ जिल्ह्यांत म. जोतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना सुरू आहे. परंतु, दुसरीकडे पुणे येथील ससून हॉस्पिटलचा टोल फ्री क्रमांक देत बोगस कार्ड छापून  दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील लोकांची या योजनेच्या नावाखाली आर्थिक लूट केल्याच्या घटना अमरावती जिल्ह्यात घडल्या आहेत.

 

दरम्यान, याचप्रमाणे गरीब, अशिक्षित कुटुंबाच्या घरी जाऊन बोगस कार्ड दाखवत त्यांच्याकडून १५० ते २०० रुपये आर्थिक लूट करणारी ‘टोळी’ जालन्यात कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
 जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभासाठी केशरी, पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा रेशनकार्ड आवश्यक आहे.  या योजनेंतर्गत दीड लाखापर्यंत ९७१ शस्त्रक्रियांचा लाभ घेता येतो. यासाठी जिल्हानिहाय रुग्णालये नियुक्त करून दिली आहेत. मोफत उपचाराचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात ११ रुग्णमित्र काम करत आहेत. त्यांच्याकडून रुग्णालयात आलेल्या नातेवाइकांना या योजनेची माहिती दिली जाते.

 

परंतु, या योजनेच्या नावाखाली बोगस कार्ड छापून या योजनेत सहभागी करून घेण्याच्या नावाखाली  रुग्णांकडून १५० ते २०० रुपये घेऊन लूट केली जात असल्याचे अंबड, मंठा तालुक्यात आढळून आले. अशिक्षित लोकांना  बोगस कार्ड दाखवत सहा जणांची सवलत असल्याचे सांगून कार्डवर नावे लिहून घेतात. नंतर ग्रामपंचायतीचाही शिक्का घेणार असल्याचे सांगून त्या कार्डच्या बदल्यात पैसे घेतले जात. बोगस कार्डधारक गावात आल्यास त्यांची माहिती टोल फ्री क्रमांकावर देण्याचे आवाहनही केले जाते.   

 

कार्ड बोगस असल्याचा संशय येऊ नये म्हणून त्या कार्डवर धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नावाने बोगस नोंदणी क्रमांक, ट्रस्ट नंबर, जीवनदायीचा लाेगो, कुटुंब प्रमुखाचे नाव,  व्यवसाय, पत्ता, दारिद्र्यरेषेखालील यादीतील क्रमांक, संपर्कासोबतच योजनेतील यादी क्रमांक टाकून कुटुंबातील लाभार्थींची नावे दिली जातात.

 

अशी दिली जातात आश्वासने
आरोग्य सवलत कार्ड योजनेतून  मेडिकलमध्ये १४ टक्के सवलत तसेच हे कार्ड शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयातही चालत असल्याची माहिती देऊन मुख्य कार्यालय हे पुणे येथील ससून हॉस्पिटल असल्याचे दाखवून त्याचा टोल फ्री क्रमांकही दिला जात आहे.

 

शेवटी तक्रार दाखल
या गैरप्रकाराबाबत ग्रामीण भागातून काही सजग नागरिकांनी  पोलिस ठाण्यात तक्रार दिली.  या प्रकरणात एक व्यक्तीचे नावही उघड झाले आहे. परंतु, पोलिसांनी पुढील कारवाईसाठी त्याचे नाव सांगू नका, असे सांगितले.  
- डॉ. मिलिंद जोशी, जिल्हा समन्वयक, म.ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना, जालना.

 

बातम्या आणखी आहेत...