आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक कर्ज वाटपात दिरंगाई; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर सहा बँकांच्या मॅनेजरवर गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- सातत्याने शेतकऱ्यांच्या येणाऱ्या तक्रारी तसेच विविध पक्ष-संघटनांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पीककर्ज वाटपास टाळाटाळ करणाऱ्या सहा बँकांच्या मॅनेजरवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून गुन्हा नोंद झाला आहे. जिल्ह्यात खरिपाच्या २७ टक्के पेरण्या झाल्या असून पीक र्जाचे वाटप मात्र १७ टक्के असे विरोधाभासी चित्र होते. बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 


कळंब येथे मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राधाकृष्ण गमे यांच्याकडे केल्या होत्या. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पीककर्ज वाटपाचा बँकांचा आढावा सादर करण्याचे आदेश सहकार विभागाला दिले. यामध्ये कळंब व वाशी तालुक्यातील सहा राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात हलगर्जीपणा केल्याचे समोर आल्यानंतर या बँकांच्या शाखा व्यवस्थापकांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादंविच्या कलम १८८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक देशमुख यांच्या निर्देशानुसार कळंबचे साहाय्यक निबंधक बालाजी कटकधोंड व वाशीचे साहाय्यक निबंधक कुमार बारकूल यांच्या फिर्यादीवरून सदरील गुन्हे दाखल झाले आहेत. 


यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे कळंबचे शाखाधिकारी कृष्णकांत काळे, अंदोरा शाखेचे शाखाधिकारी महेश आनंदगावकर, मंगरुळ शाखेचे शाखाधिकारी एम.व्ही. वेदपाठक, वाशीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी हमीद ओहाळ, बँक ऑफ महाराष्ट्र पारगांवचे शाखाधिकारी अनूज टेके व बँक ऑफ महाराष्ट्राचे तेरखेडाचे शाखाधिकारी संजय तिर्की अशा सहा जणांविरोधात संबधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांकडून पीक कर्ज वाटपाबाबत राष्ट्रीयीकृत बँकांकडून मानहानी होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. प्रत्येक आढावा बैठकीतही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात येत होत्या. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्ष, संघटनांनीही राष्ट्रीयीकृत बँकांिवरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. तरीही या बँकांकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी सहा बँकांच्या शाखाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. 


पेरण्या २७ टक्क्यांवर पीककर्जवाटप १७ टक्क्यांवर
उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण व जिल्हा बँकेला मिळून एकूण १ लाख ३७ हजार ९७१ शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी सदरील बँकांनी केवळ २३३९८ शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले असून ते उद्दिष्टाच्या १७ टक्के इतके कमी आहे. जिल्ह्यात खरिपाच्या २७ टक्के पेरण्या झाल्या असून पीककर्ज वाटप मात्र १७ टक्के आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी उद्दिष्टाच्या अवघ्या ६ टक्के तर ग्रामीण बँकांनी ८ टक्के पीक कर्ज वाटप केले.

बातम्या आणखी आहेत...