आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनेला रेल्वे पटरीवरून बाजूला केले, पण रेल्वेच्या धक्क्याने सासऱ्याचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना -  सुनेला वाचवण्यासाठी धावत असलेल्या सासऱ्याचा मनमाड-सिकंदराबाद (अजिंठा एक्स्प्रेस) रेल्वे गाडीखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास रेल्वेस्थानक परिसरात घडली आहे. मधुकर तुकाराम वाघमारे (५५, म्हातारगाव, जि. नांदेड) असे मृताचे नाव आहे.  


जालना शहरातील रेल्वे स्थानकात वर्दळीमुळे नेहमीच अपघात घडत आहेत. दरम्यान, मधुकर   वाघमारे सुनेची मनःस्थिती सुव्यवस्थित नसल्यामुळे तिला उपचारासाठी घेऊन जात होते. दरम्यान, रेल्वेस्थानकात आल्यानंतर सून पायी चालत होती. तिच्या दिशेने रेल्वेगाडी येत असूनही तिचे दुर्लक्ष असल्याचे सासरे मधुकर वाघमारे यांच्या लक्षात आले. त्यांनी धाव घेत सुनेला पटरीच्या बाजूला ढकलले. परंतु तोपर्यंत मनमाडकडून येणाऱ्या अजिंठा एक्स्प्रेसचा जोराचा धक्का लागल्याने वाघमारे हे पटरीपासून लांबपर्यंत फेकले गेले.

 

परिसरातील प्रवाशांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर एकच गर्दी झाली. यानंतर पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मधुकर यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात  दाखल केले. परंतु , तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. जिल्हा रुग्णालयात वाघमारे यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.   या प्रकाराबाबत पोलिसांनी वाघमारे यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. यानंतर गुरुवारी सकाळी त्यांच्या कुटुंबीयांनी येऊन मृतदेह ताब्यात घेत अंत्यविधीसाठी नांदेडकडे रवाना झाले होते. या प्रकरणाचा अधिक तपास अंमलदार प्रभाकर सवडे हे करीत आहेत.  


कठडे बसवावे

मोतीबागेकडील रेल्वे उड्डाणपूल ते सारवाडी जवळील उड्डाण पुलावरील दोन किलोमीटर अंतराच्या मार्गात रेल्वेस्थानक, गोकुळनगर, अंबड रोड या तीन ठिकाणीच रेल्वे गेट आहे. दोन किलोमीटरच्या अंतरात टीव्ही सेंटर, गोकुळनगरी, योगेशनगर, सुवर्णकार नगर, सोनल नगर, आनंद नगर आदी भाग येत आहेत. दोन किमीपर्यंत  कठडे बसवण्याची गरज असल्याची मागणी मराठा महासंघाचे अरविंद देशमुख, अॅड. शैलेश देशमुख, मुरली सुरासे, भास्कर पडूळ आदींनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...