आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड- पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करावी की व्यवसाय, असा प्रश्न सर्वच तरुणांपुढे असतो. यातून योग्य पर्याय निवडणे हेसुद्धा आव्हानच. ग्रामीण भागामध्ये शेतकरी, कामगारांना रोजगार मिळाला पाहिजे असे अनेक जण सांगतात. परंतु किती जण गावातच उद्योग उभारतात, हाही शोधाचा विषय असतो. बीड तालुक्यातील नेकनूर या छोट्याशा गावांमधील पदवी शिक्षण पूर्ण झालेल्या प्रवीण बबनराव थोरात हा तरुणही उद्योग की नोकरी, या चक्रव्यूहात अडकला होता. २००९ मध्ये त्याने पदवी शिक्षण पूर्ण होताच गावातील बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्याचा उद्देशाने स्वतःच्या शेतीत रेशीम कोश खरेदी आणि त्यातून धागा निर्मितीचा उद्योग सुरू केला. या उद्योगाची अल्पावधीतच भरभराट झाली. आठच वर्षांत या उद्योगाने वर्षाला दीड कोटीची उलाढाल केली. नेकनूर येथील रेशीम धाग्याला महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्र प्रदेशमधील रेशीम बाजारपेठेमध्ये मागणी मिळाली आहे.
नेकनूर (तालुका बीड) येथील प्रवीण थोरातपुढे २००९ या वर्षामध्ये पदवी शिक्षण पूर्ण होताच काय करावे, असा प्रश्न पडला. ग्रामीण भागात कोणत्या उद्योगाला यश येर्इल याचा अभ्यास त्याने सुरू केला. काही महिन्यांमध्ये रेशीम कोश खरेदी करणे आणि त्यातून धागा निर्मिती करणे या उद्योगावर त्याने शिक्कामोर्तब केले. या उद्योगातून स्वतःच्या कौटुंबिक गरजा पूर्ण करत आणि इतरांना रोजगार मिळेल व बाजारपेठही मिळवून उद्योगाला बळकटी मिळेल, असे चित्र स्पष्ट झाले. २०१० मध्ये स्वतःच्या क्षेत्रामध्ये ३० बाय ८० च्या पत्र्यांचे शेड उभारून व २५ लाख रुपयांची गुंतवणूक करत उद्योगाची सुरुवात केली.
देशातील सर्वात मोठी रेशीमची बाजारपेठ असलेले गाव म्हणजे रामनगर मार्केट. या मार्केटमधील कोश खरेदीचे वर्गवारीनुसार (ग्रेड) भाव जाहीर होताच त्याच दराने नेकनूर या ठिकाणी कोश खरेदी सुरू केली. मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये नेकनूर येथे कोश खरेदी होत झाल्याची माहिती मिळाल्याने जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, तुळजापूर, नांदेड, हिंगोली, परभणी या मराठवाड्यातील जिल्ह्यांसह दौंड, बारामती, पुणे, वर्धा, सोलापूर, बुलडाणासह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतून नेकनूर येथे शेतकरी रेशीम कोश विक्रीसाठी येऊ लागले. या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू लागल्याने उद्योगाची व्याप्तीही वाढली.
धागा निर्मितीचे प्रशिक्षण दिले
नेकनूर गावामध्ये रेशीम धागा तयार करण्यासाठी महिलांना आणि पुरुषांना प्रशिक्षण दिले. शेतामध्ये व इतर ठिकाणी मिळणाऱ्या रोजंदारीपेक्षा चांगले पैसे मिळतील असा असाच प्रयोग प्रवीण थोरातने गावात सुरू केला. त्याने दिवसाला ३०० रुपये रोजगार दिला. कमी कष्टाचे आणि कुशल काम करणाऱ्यांना या कामाचे महत्त्व समजले. यातून सद्य:स्थितीला ११ महिला आणि सहा पुरुष अशा १७ जणांना या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध झाली.
३०० ते ७०० रुपये दर
रेशीम कोश खरेदी ही कोश दर्जानुसार केली जाते. रामनगर मार्केटमधील कोश ग्रेडनुसार ३०० ते ७०० असा प्रति किलोचा दर नेकनूर येथे दिला जातो. यामुळे राज्यभरातील शेतकरी थेट नेकनूर येथे कोश विक्रीसाठी येऊ लागली.बीडच्या बाजारामध्ये सर्व प्रकारचे कपडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परंतु सिल्क स्पेशालिटी कमी असल्याने बीडमध्ये स्वतंत्र सिल्क गारमेंट सुरू करण्याचा मानस आहे.
- प्रवीण थोरात, युवा उद्योजक नेकनूर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.