आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

237 कोटींची थकबाकी; 687 पथदिवे, 886 पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- ग्रामपंचायती व नगरपालिकांकडील वीज बिलाच्या २३७ कोटी ८६ लाख ८१ हजार रुपये थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणने मोहीम हाती घेतली आहे. ग्रामीण व शहरी भागातील ६८७ पथदिवे, ८८६ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी ग्रामीण भागात दुष्काळाप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली असून घागरभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ नागरिकांवर आली आहे. तसेच पथदिव्यांची वीज बंद असल्यामुळे अंधारातून चाचपडत वाट शोधावी लागत आहे.   


मागील १० ते १२ वर्षांपासून महावितरणने कधीच गांभीर्याने वसुली केली नाही. मात्र, यावर्षी प्रथमच महावितरणने पूर्णशक्तीनिशी वसुलीसाठी कंबर कसली आहे. पूर्वी केवळ चालू बिल भरून घेऊन वीजपुरवठा सुरू ठेवला जात होता. थकबाकी व त्यावरील व्याजाबाबत कोणीही बोलत नव्हते. यामुळे नगरपालिका व ग्रामपंचायतींकडे थकबाकीचा डोंगर निर्माण झाला आहे. आता ही थकबाकी भरण्यासाठी पदाधिकारी व प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहेत.   


जिल्ह्यात नगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रात १६११ पाणीपुरवठा योजना आहेत. यापैकी १५७१ याेजनांवर ५२ कोटी १२ लाख ९४ हजार रुपये थकबाकीचा भार आहे. आता महावितरणने हळूहळू कारवाईचा फास आवळत ८८६ योजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यातील केवळ १९६ योजनांपोटी ३१ लाख ४५ हजार रुपये भरण्यात आले आहेत. कूपनलिका, विहिरीवरील विद्युतपंपाची बाकी भरून ते सुरू केले आहेत. ग्रामीण भागातील ११८२ पथदिवे योजनांची  १५९ कोटी ८० लाख ९९ हजार रुपये थकबाकी आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात ५९८ योजनांची वीज तोडली आहे. शहरी भागात ४२५ पैकी ८९ याेजनांचा पुरवठा खंडित केला. उस्मानाबाद शहरासह ८८ लाख ५२ हजारांची तर ग्रामीण भागात ११ लाख ३१ हजार रुपयांची वसुली झाली.

   
सध्या पाणी उपलब्ध असतानाही ग्रामीण भागात दुष्काळाप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे. सार्वजनिक जलस्रोतांतून पाणी मिळणे बंद झाल्यामुळे नागरिकांना दुष्काळी परिस्थितीप्रमाणे भटकंती करण्याची वेळ आली आहे. घागरभर पिण्यासाठी पाणी उपलब्ध करताना दमछाक होत आहे. दूरवर शेतात जाऊन पाणी आणावे लागत आहे. तसेच रात्री पथदिवे बंद असल्यामुळे अंधारात चाचपडत चालावे लागत आहे. अगोदरच रस्ते खराब आहेत. अशात अंधारामुळे दुहेरी त्रास होत आहे.     

 

अगोदर थकीत  बिलाचे बोला  
महावितरण या वेळी केवळ चालू बिल भरून घेण्यास नकार देत आहे. पूर्वीच्या थकबाकीबाबत तोडगा निघाल्याशिवाय चालू बिलाबाबत बोलूही दिले जात नाही. उस्मानाबाद नगरपालिकेच्या चालू बिलाचा चेक नाकारण्यात आला होता. नंतर नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी थकबाकीच्या हप्त्यासह बिल भरल्यावर यावर तोडगा निघाला होता. अशीच सक्ती सर्व पालिका व ग्रामपंचायतींना करण्यात येत आहे. यामुळे पदाधिकाऱ्यांची त्रेधा उडत आहे.   

 

७९ कोटींचे व्याज   
महावितरणने एकूण बिलावर ७८ कोटी ९८ लाख रुपयांचे व्याज आकारले आहे. ग्रामपंचायती व नगरपालिकांना याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. काही सत्ताधारी पक्षाच्या संस्थांनी शासनाकडे वजन खर्ची घातले. मात्र, महावितरण कशाचीच माफी देण्यास तयार नाही. विशेष म्हणजे अधिक थकबाकी असेल तर हप्ता पाडण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, १५ पेक्षा अधिक हप्ते पाडता येणार नाहीत. असे शासनाचेच पत्र आहे.   

 

शब्दाला नाही मान   
थकबाकीची वसुली न केल्यास कार्यकारी अभियंत्यांसह, सहायक अभियंत्यांना तसेच त्याखालील कर्मचाऱ्यांनाही कारवाई करण्याची तंबी देण्यात आली आहे. यामुळे पूर्वी राजकीय नेत्यांच्या शब्दाला मान देणारे अधिकारी, कर्मचारी त्यांचा कॉलही स्वीकारण्यास तयार नाहीत. यामुळे बडे नेतेही चक्राऊन गेले आहेत.   

 

 

थकबाकी, वसुली  
> २३७.८६ कोटी एकूण थकबाकी   
>  ७८.९८ काेटी व्याजाची रक्कम   
>  १५९.८० कोटी ग्रामीण पथदिव्यांची थकबाकी   
>  १.२६ कोटी आतापर्यंत वसुली   
>  १६०७ पथदिव्यांच्या योजना   
>  १६११ पाणीपुरवठा योजना

बातम्या आणखी आहेत...