आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक: वरपुडकरांनी वर्चस्व मिळवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी अध्यक्षपदासाठी त्यांचीच उमेदवारी अपात्र ठरली गेल्यानेे त्यांना जबर धक्का बसला आहे. विद्यमान उपाध्यक्ष पंडितराव चोखट यांना या गोंधळात अनपेक्षितपणे अध्यक्षपदाची लॉटरीच लागली. दुसरीकडे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटातील अध्यक्षपदाचे उमेदवार विजय जामकर यांच्या पराभवाने बोर्डीकरांची बँकेवरील सद्दी संपली.    


जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत मंगळवारी (दि.१५) झालेल्या अनपेक्षित राजकीय हालचालींमध्ये वरपुडकर-बोर्डीकर गटाने मोठे धक्कातंत्र अवलंबिले. बहुमताचा आकडा गाठण्याच्या वरपुडकरांच्या प्रयत्नांना यश तर आले. मात्र बोर्डीकर गटाने सहकार कायद्यातील तरतुदीवर बोट ठेवून अध्यक्षपदाच्या उमेदवारीपासून वरपुडकरांना दूर ठेवण्यात यश मिळविले. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत पराभव झाला असला तरी प्रत्यक्ष वरपुडकरांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपासून दूर ठेवण्याचे बोर्डीकरांचे राजकीय कसब यशस्वी झाले आहे. 

   
अध्यक्षपदासाठी वरपुडकर यांनी तीन अर्ज दाखल केले होते. त्याच वेळी विरोधकांनी सोमवारपासून त्यांच्या उमेदवारीबाबत सुरू केलेल्या आक्षेपाच्या खेळ्यांमुळे वरपुडकर यांनी आपल्या सोबतच समर्थक व बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष पंडित चोखट यांचाही अर्ज दाखल केला.
बोर्डीकर गटांकडून अपेक्षेप्रमाणे संचालक विजय जामकर यांचा अर्ज दाखल झाला होता. छाननी दरम्यान आ.तानाजी मुटकुळे यांनी वरपुडकरांच्या अर्जावर आक्षेप नोंदवला. त्यावर सुनावणी देताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी वरपुडकर यांचे तिन्ही अर्ज अवैध ठरविले.


जामकर यांच्या उमेदवारीवरही दाखल झालेला आक्षेप मात्र फेटाळला गेला. परिणामी निवडणूक रिंगणात वरपुडकर समर्थक चोखट व जामकर हे दोघेच राहिले. या वेळी बँकेचे १८ संचालक उपस्थित होते. प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया घेताना जामकर यांच्या बाजूने सहा जणांनी हात वर केला तर चोखट यांच्या बाजूने ११ जणांनी समर्थन दिल्याने त्यांचा विजय झाला. ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव गोळेगावकर हे तटस्थ राहिले.

 

पंडित चोखटांची लॉटरी   
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मागील निवडणुकीत वरपुडकर गटाकडून निवडून आलेले पंडित चोखट हे नंतर माजी आमदार बोर्डीकर गटात दाखल झाले होते. त्यातून त्यांनी उपाध्यक्षपद पदरी पाडून घेतले होते. मात्र या वेळी पुन्हा आपली भूमिका बदलत ते वरपुडकर गटात दाखल झाले. वरपुडकरांचे डमी उमेदवार म्हणूनच त्यांचा अर्ज दाखल झाला होता. मात्र वरपुडकरांचाच अर्ज अवैध ठरल्याने चोखट यांना अनपेक्षितपणे अध्यक्षपदाची लॉटरी लागली.

 

काय होता आक्षेप?
दोन महिन्यांपासून अध्यक्षपदासाठी सर्व समीकरणे जुळवून बँकेवर वर्चस्व स्थापित करण्याच्या प्रयत्नात माजी मंत्री सुरेश वरपुडकर यशस्वी झाले. मात्र प्रत्यक्ष पदावर विराजमान होण्यापासून वंचित राहिले. ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रक्रिया मतदारसंघातून निवडून आलेले होते. परंतु हा मतदारसंघ फेडरल सोसायटीशी संलग्न नसल्याने ते सहकार कायद्याच्या कलम ७३ (ड) नुसार अध्यक्षपदासाठी पात्र ठरू शकत नाहीत, असा भाजपचे आ.तानाजी मुटकुळे यांनी घेतलेला आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य करीत त्यांचा अर्जच अवैध ठरवला.

बातम्या आणखी आहेत...