आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाधिकारी जगताप यांची जामिनावर मुक्तता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद -  विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल असलेले शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची अटकेच्या पाच दिवसानंतर शनिवारी (दि. २६) जामिनावर मुक्तता करण्यात आली  आहे.  मात्र, जिल्हा सोडण्याअगोदर त्यांना न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सरकारी पक्षाचा पुरावा न फोडण्याचीही तंबी न्यायालयाकडून देण्यात आली आहे.   


एका सहकारी   महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी जगताप यांच्यावर १६ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर जगताप स्वतःहून मंगळवारी (दि. २२) पोलिसांना शरण आले.

 

येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात त्यांनी मंगळवारी सायंकाळी सात वाजता स्वतःहून अटक करून घेतली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलिस कोठडीचा अवधी पूर्ण झाल्यावर त्यांना पुन्हा शनिवारी न्यायालयात उपस्थित करण्यात आले. या वेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनुपमा पारशेट्टी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. 


जगताप यांचे विधिज्ञ अॅड. विजयकुमार शिंदे व अॅड. विश्वजित शिंदे यांनी जगताप यांच्यावर दाखल झालेले गुन्हे  कायदेशीररीत्या ‘बेलयेबल’ असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच सात वर्षाखालील शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांमध्ये शिथिलता देण्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा हवालाही अॅड. शिंदे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सादर केला.    


सरकारी पक्षाने या वेळी कोठडीची मागणी केली होती. मात्र, शिंदे यांनी तपास पूर्ण झाला असताना आता कोठडी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनुपमा पारशेट्टी यांनी जगताप यांची जामिनावर मुक्तता केली. मात्र यासाठी १५ हजार रुपयांचा जातमुचलका न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले. आता तब्बल पाच दिवसानंतर जगताप यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजता पोलिसांच्या ताब्यात गेलेले जगताप शनिवारी दुपारी १२.३० वाजता बाहेर आले.  तत्पूर्वी त्यांना तब्बल ३७ दिवस पोलिस यंत्रणेला चकवा देत भूमिगत राहून जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यांना अपयश आल्यामुळे ते स्वतःहून पोलिसांकडे आले होते.   

बातम्या आणखी आहेत...