आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निर्णायक; उमरगा बाजार समिती सभापतिपदाची निवडणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा- नानाराव भोसले यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर निवडीसाठी सहायक निबंधकांनी शनिवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २० डिसेंबरला संचालक मंडळाची विशेष सभा बोलवण्यात आली आहे.   

 
काँग्रेस व भाजपने एकत्र येत वर्षांपूर्वी येथे सत्ता प्रस्थापित केली होती. परंतु सभापती भोसले यांनी पक्षादेशानुसार राजीनामा दिल्याने ही निवडणूक होत आहे. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेकडे सर्वाधिक ७ संचालक आहेत. काँग्रेसकडे ६, राष्ट्रवादी काँग्रेसकडे २ आणि भाजपकडे ३ संचालक आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत नाराज झालेल्या दत्तू कटकधोंड यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली होती. त्यामुळे भाजपचे संख्याबळ एकने घटले आहे. अखेरच्या राजकीय घडामोडीत बहुमत ज्यांना बहुमत प्राप्त होईल त्यांचाच सभापती होणार आहे.    काँग्रेस आणि शिवसेनेला सभापतिपद मिळवण्यासाठी बरीच जुळवाजुळव करावी लागणार आहे. 


वर्तमान परिस्थितीनुसार काँग्रेसच्या ताब्यातील बाजार समिती शिवसेनेकडे जाण्याची शक्यता दिसून येत आहे. त्या दृष्टीने व्यूहरचना आखण्यात येत आहे. काठावरचे गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या काँग्रेसने सभापतिपदाचा राजीनामा देऊन पुन्हा परीक्षा देण्याचे धाडस केले. त्यामुळे त्यांच्याकडून कोणती खेळी खेळण्यात येते, हे निवडणूक निकालानंतरच कळेल.

 

राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक   

काँग्रेसला भाजपने साथ दिल्याने भाजपचे रमेश माने यांना उपसभापतिपदाची संधी मिळाली. परंतु शिवसेना-राष्ट्रवादीच्या ९ संचालकांपैकी एकाने उपसभापतिपदासाठी मतदान केले. आता सभापती निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबतच राहिली व भाजपतून शिवसेनेत गेलेल्या  संचालकाने शिवसेनेच्या बाजूने मतदान केल्यास शिवसेनेला सभापतिपद मिळू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरेल. काँग्रेसला स्वत:कडे सभापतिपद ठेवायचे झाल्यास कसरत करावी लागेल. परंतु सत्तेसाठी कोणत्याही पक्षासोबत युती-आघाडीची परंपरा सुरू झाल्याने सभापती कोण होणार, यासाठी २० डिसेंबरची प्रतीक्षा करावी लागणार आहे.    

 

पीठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत बैठक

सभापती निवडीसंदर्भात २० डिसेंबरला पीठासीन अधिकारी तथा सहायक निबंधक पी. एल. शहापूरकर यांच्या अध्यक्षतेत बैठक होणार आहे. समितीच्या १८ संचालकांना बैठकीचे पत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे सचिव सिद्धाप्पा घोडके यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...