आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसतोड कामगारांच्या मुलांवर अमेरिकेत होणार संशोधन; अॅपने जाणार अहवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील डॉ. जॅकलिन भाभा यांनी जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये जाऊन ऊसतोड कामगारांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. - Divya Marathi
अमेरिकेतील डॉ. जॅकलिन भाभा यांनी जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये जाऊन ऊसतोड कामगारांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली.

जालना- मराठवाड्यात अति दुष्काळग्रस्त भाग म्हणून जालना व बीड दोन्ही जिल्हे परिचित आहेत. दरवर्षी ऊसतोडीसाठी या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मजूर स्थलांतरित होतात. यामुळे मजुरांच्या मुलांचा शैक्षणिक प्रश्न नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. दरम्यान, अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी जानेवारीत जालना आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांतील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांच्या शैक्षणिक परिस्थितीची पाहणी केली होती. यानुसार शिक्षण विभाग व युनिसेफने यासंदर्भात सर्वेक्षण सुरू केले अाहे. ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शैक्षणिकतेवर झालेल्या परिणामाचा अहवाल अॅपद्वारे पाठवण्यात येणार असून अमेरिकेत त्यावर संशोधन होणार आहे.    


जालना जिल्ह्यात साखर कारखाने, दगड खाणी, स्टोन क्रशर, वीटभट्ट्या, जिनिंग प्रेस, फिरते कामगार यांच्या मुलांच्या सर्वेक्षणासोबतच त्या बालकांशी संवाद साधून तो अहवाल पाठवण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. युनिसेफ, शिक्षण विभाग, स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान, परतूर, सॅक्रेड यासह भोकरदन व गावपातळीवर २२० बालमित्रांच्या मदतीने हे सर्वेक्षण  सुरू आहे. या यासंदर्भात झालेल्या बैठकीला डाएटचे प्राचार्य भटकर, मापारी, सुनील मावकर, युनिसेफचे राज्य सल्लागार विकास सावंत, स्वराजचे भाऊसाहेब गुंजाळ, एकनाथ राऊत, महादेव हिवाळे, सुनील ससाणे, रामेश्वर राऊत आदींची उपस्थिती होती.    
 

अॅपने जाणार अहवाल 
येत्या चार महिन्यांत शिक्षण, युनिसेफ, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे करण्यासोबतच त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्यांचा अहवाल अॅपद्वारे अमेरिकेला पाठवला जाणार आहे. यासाठी कारखाने, औद्योगिक वसाहती, स्थलांतरित असणाऱ्या गावांची संख्या, बाहेरगावहून आलेले मजूर यांची माहिती एकत्रित करण्यात आली असून त्या माहितीच्या आधारे हे सर्वेक्षण केले जात आहे.    

 

 

सर्वेक्षण सुरू  
अहवाल पाठवण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षण  सुरू आहे. काही दिवसांतच अहवाल पाठवल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील नियोजन करणार आहे.    
-पांडुरंग कवाणे, शिक्षणाधिकारी, जालना.   

 

जालना जिल्ह्यातील १०५ शैक्षणिक वसतिगृहे बंद 
२०१६ या वर्षात जालना जिल्ह्यात ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी १०५ शैक्षणिक वसतिगृहे सुरू करण्यात आली होती. परंतु, २०१७ पासून  ही वसतिगृहे बंद असल्यामुळे अनेक बालके शिक्षणापासून वंचित राहत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...