आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यातील रसायन तंत्रज्ञान संस्था ठरेल मराठवाड्याच्या विकासाचे मॅग्नेट- CM

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - एखाद्या भागात मोठे उद्योग येण्यासाठी पोर्ट, रस्ते, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मानव संसाधनांची आवश्यकता असते. डीएमआयसी, ड्राय पोर्ट, समृद्धी महामार्ग यामुळे उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.  रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी) मुळे मानव संसाधनाची आवश्यकता पूर्ण होईल. त्यामुळे या भागात नवीन उद्योगांना आकर्षित करण्यासाठी आयसीटी ही मॅग्नेट ठरेल,  असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आयसीटीच्या जालना येथील मराठवाडा उपकेंद्राच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.  


भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरसवाडी येथे आयसीटीचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार संतोष दानवे, नारायण कुचे, आयसीटीचे कुलगुरू जी. डी. यादव, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आमदार विलासराव खरात, अरविंद चव्हाण, कैलास गोरंट्याल, उद्योजक घनश्याम गाेयल, किशोर अग्रवाल, राजेश सोनी, अर्जुन गेही, भास्कर दानवे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, औरंगाबाद येथील मंत्रिमंडळ बैठकीत या संस्थेला जालना येथे मंजुरी दिली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रचंड पाठपुरावा केल्यामुळे केवळ वर्षभराच्या आत या संस्थेचे भूमिपूजन होत आहे. 


या संस्थेकडे केवळ एक शैक्षणिक संस्था म्हणून न पाहता विकासाचे मॅग्नेट म्हणून पाहावे. या भागात नवे उद्योग यावेत म्हणून डीएमआयसी, ड्राय पोर्ट, समृद्धी महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. मानव संसाधनांची गरज आयसीटीमुळे भरून निघेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 


पुणे अगोदर विद्यानगरी झाले, त्यानंतर ते उद्योगनगरी म्हणून विकसित झाले. देशातील सर्वोत्तम सुविधा असलेले औद्योगिक क्षेत्र म्हणून शेंद्रा-बिडकीन विकसित करण्यात येत आहे, तर जालना येथे आयसीटी ही संस्था आल्याने पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राच्या उद्योग विकासाचे केंद्र औरंगाबाद व जालना राहील, असे मुख्यमंत्री म्हणाले. या संस्थेसाठी ३९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता तातडीने हे शैक्षणिक संकुल विकसित करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. 

 

आमचा फोकस मराठवाड्यावर   
संपूर्ण राज्याचा विकास व्हावा यासाठी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील अविकसित भाग विकसित झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळेच मराठवाड्याच्या विकासावर आमचा फोकस आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आयआयटीच्या दर्जाची आयसीटी ही संस्था विदर्भात व्हावी अशी अपेक्षा न ठेवता ती मराठवाड्यात आली पाहिजे अशी सूचना मी केली आणि आज ती प्रत्यक्षात उतरल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.   

 

ऐतिहासिक क्षण   
आयसीटी जालना शहरात सुरू होणे हा या जिल्ह्याच्या विकासाच्या टप्प्यातील ऐतिहासिक क्षण असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह खासदार दानवे, पालकमंत्री लोणीकर व राज्यमंत्री खोतकर यांनी व्यक्त केली. आतापर्यंत ज्या मागण्या केल्या त्या सर्व मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी काहीतरी योजना दिली अशा शब्दांत मंत्री खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

 

बातम्या आणखी आहेत...