आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जाच्या चिंतेने शेतकऱ्याने स्वत:ला संपवले; जिल्हा परिषद शाळेतील झाडाला घेतला गळफास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी- कर्जाच्या चिंतेत जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील झाडाला दोरीने गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना वडवणी तालुक्यातील सोन्ना खोटा गावात सोमवारी रात्री अकरा वाजता घडली. 

 

सोन्ना ( खोट्टा) येथील सदाशिव रंगाजी डोंगरे ( ५६) शेतकऱ्याकडे केवळ १ हेक्टर कोरडवाहू जमीन होती. त्याच्याकडे सावकारासह व एसबीआयच्या वडवणी शाखा असे मिळून जवळपास दोन लाख रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गावातील जिल्हा परिषद शाळेच्या चौथीच्या वर्गाबाहेर नांदरूकीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. डोंगरे हे सकाळी घरात आढळून न आल्याने कुटूंबातील लोकांनी त्यांची शोधाशोध केली तेव्हा शाळेतील झाडाला त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. सदाशिव डोंगरे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. 


पत्नी परतल्यानंतर अंत्यसंस्कार
आत्महत्या केलेले शेतकरी सदाशिव डोंगरे यांची पत्नी कोल्हापूर येथे भावाला भेटण्यासाठी गेले आहे. ती परत आल्यानंतरच शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 


शेतकरीविरोधी धोरण कारणीभूत 
सरकार सतत शेतकरी विरोधी धोरण अवलंबत आहे. पिकांना दिला जाणारा कमी भाव, नुकसानीचा कमी मोबदला, बोंडआळीचे अनुदान, बी- बियाण्यात घोटाळा, पीक कर्जाबाबतीत बँकेची अडवणूक या सततच्या त्रासाला शेतकरी कंटाळले आहेत. यातूनच शेतकरी आत्महत्या करत आहेत. 
- विनायक मुळे, शिवसेना तालुका प्रमुख, वडवणी. 

बातम्या आणखी आहेत...