आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भांडणात शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू; पाली येथील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- शेतीच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर एका वृद्धाला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना पाली (ता. बीड) येथे गुरुवारी सायंकाळी घडली.  विलास गंगाधर देशमुख (६०, रा. पाली) असे मृताचे नाव आहे. त्यांची पाली शिवारात शेती आहे. त्यांच्या शेताला चिकटून रावसाहेब केशव मोरे (रा. आहेरवडगाव, ता. बीड) यांचे शेत आहे. मोरे यांच्याकडे विलास देशमुख यांचे बंधू प्रदीप देशमुख यांचे शेत बटईने आहे. 


गुरुवारी विलास देशमुख यांच्या शेतात ज्वारी काढणीचे काम सुरू होते. ते सायंकाळी शेतात गेल्यानंतर क्षुल्लक कारणावरून त्यांचे रावसाहेब मोरे यांच्याशी भांडण झाले. शाब्दिक वादवादीनंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ते बांधावरच भोवळ येऊन पडले. या वेळी मोरे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनीच त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी मृत विलास देशमुख यांच्या नातेवाइकांनी बीड ग्रामीण पोलिसांत धाव घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी केली.त्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यात आली. यात विलास देशमुख यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...