आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात आग; 5 दुकाने भस्मसात, स्वस्त धान्याचे गोदाम राहिले सुरक्षित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- जुना मोंढा भागातील पाच दुकाने आगीत   भस्मसात झाली. सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर जालना पालिकेच्या अग्निशमन बंबासह परतूर येथूनही अग्निशमन बंब मागवण्यात आले. तब्बल सहा तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. यात दुचाकी, चारचाकीचे गॅरेज, कुशन व वाहनांच्या बॅटरी अशी  पाच दुकाने जळून खाक झाली. मात्र आग आटोक्यात आल्याने जवळच असलेले पुरवठा विभागाचे गोदाम सुरक्षित राहिले आहे.   


बसस्थानकापासून जवळच असलेल्या जुना मोंढा भागातील गॅरेजच्या दुकानांना सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास ही आग लागली. येथून जवळच असलेल्या एका बँकेच्या वॉचमनने फोनवरून गॅरेज मालकाला याची माहिती दिली.  काही वेळेतच जालना नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेतली.  काही वेळेतच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे पालिकेच्या तीन अग्निशमन बंबासह परतूर पालिकेचा एक बंब मागवण्यात आला.  दोन तास पाण्याचा मारा केल्यानंतर आग काही प्रमाणात अाटोक्यात आली. भंगार आणि पत्र्याखालून जाळ सुरूच होता. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी  हे भंगार बाजूला केले व आग विझविण्याचे काम सुरूच ठेवले. पहाटे ६.३० वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम पूर्ण झाले. यात येथील भंगारच्या दुकानांसह गॅरेज, कुशन वर्क, वाहनांच्या बॅटरी असे पाच दुकाने जळून खाक झाली. यात मोठे नुकसान झाले असून सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरू होते.  घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी गॅरेज मालक शेख अल्ताफ शेख मुस्ताक यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.       


पुरवठा विभागाचे गोदाम वाचले    
 जळालेल्या दुकानांशेजारीच पुरवठा विभागाचे गोदाम आहे.  आगीमुळे या गोदामाचे पत्रे तापली होती. मात्र अग्निशमन विभागाने प्रयत्नपूर्वक आग आटोक्यात आणल्याने या गोदामाचे काहीच नुकसान झाले नाही.  अग्निशमन विभागाने गोदामाची पाहणी केली.  

 
आग विझविताना अडचणी  
आग लागलेल्या दुकानांपर्यंत जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्याने अग्निशमन विभागाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या दुकानांच्या एकाच बाजूने चांगली मोकळी जागा असल्याने तेथून व इंद्रायणी हॉटेलजवळून आग नियंत्रणात आणली, तर अग्निशमन बंबांना टँकरचे ‘बॅक अप’ मिळू शकले नाही. त्यामुळे पाणी भरण्यासाठी बंबांना घटनास्थळावरुन परत जाऊन पाणी आणावे लागले.  


आगीची तीन संभाव्य कारणे   
गॅरेजमध्ये ठेवलेल्या बॅटरींचा स्पार्क होऊन आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे तर शॉर्टसर्किट किंवा वाहनांच्या ऑइलमुळे आग लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी डी.एम.जाधव यांनी   सांगितले.   

बातम्या आणखी आहेत...