आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदिवसा पाच लाख रुपये लुटले; चोर पळाले अन् सीसीटीव्ही फुटेजमध्ये व्यापारीच कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- घरातून निघालेला व्यापारी दुचाकीजवळ थांबलेला असताना अज्ञात चोरट्यांनी व्यापाऱ्याजवळ येऊन ५ लाख १२ हजार रुपये असलेली बॅग पळवल्याची घटना शहरातील जेठमलनगर भागात घडली. दरम्यान, पोलिसांच्या विविध पथकांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुचाकीजवळ तक्रारकर्ता व्यापारी उभा दिसत आहे, परंतु आरोपी मात्र दिसत नसल्याने तपासाला अडचणी येत आहेत. पोलिसांच्या पुढील तपासातच सत्यता समोर येईल. अनिल रामचंद्र अग्रवाल असे लुटलेल्या व्यापाऱ्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


गेल्या काही दिवसांपासून जालना शहरात विविध गुन्हेगारीच्या घटना घडताहेत. त्यातच पोलिसांकडून तपासासाठी संथगती, वाढती गुन्हेगारी यामुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत. त्यातच शुक्रवारी व्यापाऱ्याला भरदिवसा लुटले. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनिल अग्रवाल यांचे नवीन मोंढा भागात ट्रेडर्सचे दुकान आहे. ते दुकानात जाण्यासाठी जेठमलनगर परिसरातील भागातून दुचाकीवरून निघाले होते. त्यांच्यासोबत पैशाची बॅग होती. ही पिशवी दुचाकीच्या डिक्कीत टाकण्यासाठी जेठमलनगरच्या कोपऱ्यावर ते थांबले असता दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी पैशाची पिशवी हिसकावून पळून घेऊन गेले. हा प्रकार घडल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने त्याच्या मित्राच्या मदतीने सदर पोलिस ठाण्यात ही माहिती दिली. यानंतर सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव राऊत, विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक हनुमंत वारे यांच्यासह कर्मचारी कृष्णा तंगे, सचिन चौधरी आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनास्थळ परिसरात ४ ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता या फुटेजमध्ये तक्रारदार दिसत आहे, परंतु आरोपी दिसत नसल्याने काय गौडबंगाल आहे हे पुढील तपासातच समोर येणार आहे. 


काय म्हणतात पोलिस 
घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले नाही. अजून वेगवेगळ्या फुटेजची तपासणी करून प्रकरणाचा लवकरच तपास लावू, असे सदर बाजार ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांनी सांगितले. 


चार ठिकाणचे फुटेज तपासले
लूटमार करणाऱ्या चोरांच्या शोधासाठी चार ठिकाणचे सीसीटीव्ही तपासल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली. मुख्य मार्ग असलेल्या या ठिकाणाहून नेहमी वर्दळ असते. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे शहरवासीयांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. 


तक्रार घेण्यास चार तास 
गेल्या काही महिन्यांपासून सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हे घडत आहेत. फिर्यादी हा सकाळपासून तक्रार देत आहे. ही तक्रार घेण्यासाठीच पोलिसांनी तब्बल चार तास घालवले. यानंतरही रात्री उशिरापर्यंत तपास सुरू असल्याची कारणे सांगितली जात होती. शहरासाठी महत्त्वाचे पोलिस ठाणे म्हणून सदर बाजार पोलिस ठाण्याचा फोन नेहमीच बंद राहतो. 

बातम्या आणखी आहेत...