आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलताबादसाठीच गंगापूरच्या जाधवांनी पाठवले 12 हजार लिटरचे पाणी टँकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद - शहरात दिव्य मराठीच्या पुढाकारातून टंचाईग्रस्त खुलताबादवासीयांना माेफत  पाणीपुरवठा करण्यासाठी दानशूर व्यक्तींसह विविध संस्था, संघटनाही सरसावल्या आहेत. गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांनीदेखील रविवारी १२ हजार लिटर पाण्याने भरलेले टँकर पाठवून तहानलेल्या खुलताबादवासीयांना आधार दिला आहे.  


तालुक्यातील येसगाव प्रकल्पासह इतर लहान मोठे तलाव कोरडेठाक पडल्याने शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. याबाबत  दिव्य मराठीने बातम्यांतून वास्तव मांडल्यानंतर येथील बाबासाहेब बारगळ यांच्यासह औरंगाबाद शहरातील डीलर असोसिएशनचे अध्यक्ष शिवप्रसाद बलदवा व मराठवाडा टँकर युनियनचे अध्यक्ष मिर्झा फेरोज बेग, सचिव बब्बू शेर हे स्वखर्चाने शहराला गेल्या चार दिवसांपासून मोफत पाणी वाटप करत आहेत. दरम्यान, गंगापूर बाजार समिती सभापती तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी रविवारी खुलताबाद शहराला १२ हजार लिटर पाण्याने भरलेले टँकर औरंगाबादहून भरून पाठवले. हवलदारबाडा भागात प्रती कुटुंब २०० लिटरप्रमाणे पाणी वाटप केले. यानंतरही शहराला चार दिवसांआड १२ हजार लिटर पाण्याचे टँकर पाठवणार असल्याचे संजय जाधव  यांनी सांगितले.  

 

अधिग्रहण केलेल्या विहीर मालकांचा विरोध  
तहसीलदार अरुण जऱ्हाड यांनी शहर परिसरातील  पाच विहिरी अधिग्रहण केल्या. रविवारी संजय जाधव यांचा एक टँकर व युनियनचा एक टँकर खाली झाल्यानंतर शहर परिसरातील अधिग्रहण केलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले, परंतु संबंधित विहीर मालकांनी टँकरवाल्यांना विरोध केला. त्यामुळे टँकर परत औरंगाबाद येथे गेले व तेथून पाणी आणले. 

 

माेफत पुरवठा करणाऱ्यांचा सत्कार  
दिव्य मराठीच्या पाठपुराव्यांमुळे खुलताबाद शहराला चार दिवसांपासून टँकरद्वारे मोफत पाणी वाटप करणाऱ्या डीलर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शिवप्रसाद बलदवा, रमेश अग्रवाल व मराठवाडा टँकर युनियनचे जिल्हाध्यक्ष मिर्झा फेरोज बेग, सचिव बब्बू शेर, सदस्य मुन्नाभाई, मिर्झा अन्वर बेग, शकील शेख आदी पदाधिकाऱ्यांचा नगरपालिका प्रशासनासह शहरवासीयांनी सत्कार करून आभार मानले.

 

नगरसेवक अयाज बेग स्वखर्चाने पुरवणार पाणी
आपल्या प्रभागाला वेळेवर पाणी न पुरवल्यास नगरसेवक अयाज बेग हे आपल्या प्रभागातील रहिवासीयांना स्वखर्चाने पाणी पुरवठा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

बातम्या आणखी आहेत...