आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपींच्या अटकेनंतरच अविनाश चव्हाणांवर नातेवाइकांकडून तब्बल ३६ तासांनी अंत्यसंस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चव्हाण यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेला जमाव - Divya Marathi
चव्हाण यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेला जमाव

लातूर- स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांची रविवारी मध्यरात्री गोळी घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मारेकऱ्यांना पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांच्या नातेवाइकांनी घेतली. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. दरम्यान, पोलिसांनी मंगळवारी गुन्ह्याची उकल करुन मारेकऱ्यांना अटक केली. त्यानंतरच नातेवाईकांनी चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. 


मंगळवारी सकाळी स्टेप बाय स्टेप या कोचिंग क्लासेसच्या कार्यालयात चव्हाण यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घराकडे नेण्यात येऊन खाडगाव रोड स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांसह, स्नेही, मित्रमंडळी, विद्यार्थ्यांची मोठी संख्या होती. यावेळी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. चव्हाण यांच्या खुनात त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांचाच संबंध असल्याचे कळाल्यानंतर त्यांच्या घरच्यांनाही धक्का बसला. मंगळवारी चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्यार्थ्यासंसह शहरातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. 


अाराेपींनी पाळत ठेऊन साधला डाव 
अाराेपींच्या अटकेनंतर चव्हाण यांची हत्या नेमकी कशी झाले याचा उलगडा झाला. चव्हाण यांचा व्यवसायातील पार्टनर चंदनकुमारकडून खुनाची सुपारी मिळाल्यानंतर शार्पशूटर करणने बिहारमधून बंदूक आणि गोळ्या मागवल्या होत्या. अंबा साखर कारखान्याजवळ पिस्तुलाची चाचणीही घेतली. त्यानंतर चव्हाण यांच्यावर गहेरवार याने पाळत ठेवली. १० आणि १५ जून या दिवशी संपूर्ण दिवसभर अविनाश यांच्यावर पाळत होती. चव्हाण यांना फोन आल्यानंतर गाडी बाजूला घेऊन पार्किंग लाईट सुरू करून बोलण्याची सवय होती. ही नोंद गहेरवारने घेतली. अविनाश यांना शिवाजी शाळेजवळ फोन आला. त्यांनी गाडी बाजूला लावून संभाषण सुरू ठेवले. सुनसान रस्ता पाहून करण गहेरवारने त्यांच्यावर हल्ला केला. पहिली गोळी लोड करताना खाली पडली. दुसरी गोळी त्याने काचेतूनच झाडली. त्यात चव्हाण यांचा मृत्यू झाला. 


व्यावसायिक स्पर्धाच हत्येचे कारण 
अविनाश चव्हाण यांच्या खुनाची सुपारी देणारा चंदनकुमार शर्मा हा अविनाश यांचा व्यवसायातील भागीदार होता. मात्र अविनाश चव्हाण यांचे व्यवसायातील वर्चस्व वाढत असल्याने तो त्यांचा हितशत्रू बनला. यातूनच चंदनकुमार याने सुपारी देऊन चव्हाण यांचा खून केला.. पोलिसांनी अविनाश यांच्या हत्येप्रकरणात चंदनकुमारसह शार्पशूटर करण गहेरवार, शरद घुमे, महेशचंद्र गोगाडे आणि अक्षय शेंडगे या तिघांना अटक केली आहे. 


पळून जाण्याची तयारी 
पोलिसांनी करण गहेरवार, शरद घुमे यांना ताब्यात घेतल्याचे कळताच चंदनकुमारही पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याला पोलिसांनी आदर्श काॅलनीतून अटक केली. चंदनकुमारचा एका स्थानिक मुलीशी प्रेमविवाह झाला असून तो तुलसीधाम येथे रहायचा. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने खुनाची आणि सुपारी घेतल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील दुचाकी, पिस्तूल, १३ काडतुसे, २ लाख ३१ हजारांची रक्कम जप्त करण्यात आली. 


मारेकरी निलंगेकरांचा अंगरक्षक होता 
करण गहेरवार याने चव्हाणांची हत्या केली. तो अनेक दिवस विद्यमान पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा खासगी अंगरक्षक होता. तो काही काळ निलंगेकर यांच्या गाडीवर चालक म्हणूनही काम करत होता. याबाबत निलंगेकरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. मात्र तो सध्या कामावर नव्हता असे निलंगेकरांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...