आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादला पुढील वर्षी वैद्यकीय महाविद्यालय देणार, गिरीश महाजन यांची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे ही खुद्द मुख्यमंत्र्यांचीच अपेक्षा आहे. त्यामध्ये दुष्काळी, मागास भागांना प्राधान्य आहे. उस्मानाबादेत जिल्हा रुग्णालयाची सुसज्ज इमारत असून मुबलक जागाही उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील वर्षी उस्मानाबादला वैद्यकीय महाविद्यालयाची मंजुरी दिली जाईल.

 

सर्वपक्षीयांनीही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले. उस्मानाबाद येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी (दि.४) ते बोलत होते.

 

यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष देशमुख, आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, डॉ. प्रतापराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल खोचरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी  महाजन म्हणाले की, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उस्मानाबादेत हे महाआरोग्य शिबिर आयोजित केले अाहे.  दर्जेदार वैद्यकीय सेवा वाड्या, पाड्या, दुर्गम भागात पोहोचवून त्यांना योग्य उपचाराद्वारे आरोग्य सेवा पुरवण्याच्या हेतूने अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीतून, शासन व प्रशासनाच्या सहकार्यातून असे महाआरोग्य शिबिर आयोजित केले जात आहे. यामध्ये वैद्यकीय सुविधा व उपचारांवर कितीही रक्कम लागली तरी एक रुपयाचाही भार रुग्ण अथवा नातेवाइकांवर पडू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


हक्काच्या पाण्याची मागणी
आ.राणाजगजितसिंह पाटील व   सुजितसिंह ठाकूर यांनी उस्मानाबादेत मेडिकल कॉलेज सुरू व्हावे, कृष्णा खोऱ्यातील हक्काचे पाणी  मिळावे व तेरणा निम्न प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजनेच्या रेंगाळलेल्या कामासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली. यावर  महाजन यांनी उस्मानाबादेत मेडिकल कॉलेज सुरू करण्याबाबतची घोषणा पुढील वर्षी करण्याचे तसेच निम्न तेरणाच्या उपसा सिंचन योजनेसंदर्भात उर्वरित कामासाठी सकाळीच प्रधान सचिवांना निधी उपलब्ध करून देण्यास सांगितले.

बातम्या आणखी आहेत...