आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाच्या निवेदनामुळे परभणी जिल्हा बँक चेअरमन निवडीच्या कार्यक्रमास हिरवा कंदील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -  अब्दुल्ला खान (बाबाजानी) लतीफ खान दुर्राणी यांच्या अपात्रतेविरुद्धच्या याचिकेच्या निर्णयानंतर परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक घेण्याबाबत शासनाच्या वतीने यापूर्वीच्या सुनावणी वेळी केलेले निवेदन मागे घेण्याची परवानगी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील सुभाष तांबे यांनी शुक्रवारी (४ मे) केली.  न्या. व्ही.एल. आचलिया यांनी त्यांची विनंती मान्य करुन निवेदन मागे घेण्याची परवानगी दिली. त्यानुसार शासनाने ‘ते’ निवेदन शुक्रवारी मागे घेतले. जिल्हा उपनिबंधकांना चेअरमन पदाच्या निवडीचा कार्यक्रम नव्याने जाहीर करावा लागेल व त्यानुसार ही निवडणूक होऊ शकेल, असे सरकारी वकिलांनी सांगितले.   


अब्दुल्ला खान (बाबाजानी) लतीफ खान दुर्राणी यांच्या अपात्रतेविरुद्धच्या याचिकेवर ११ जून २०१८ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. शासनाच्या वरील निवेदनामुळे दुर्राणी यांच्या याचिकेच्या निर्णयानंतरच चेअरमनपदाची निवडणूक होणार होती. ती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलली गेली होती.  दरम्यान, द्वारकाबाई कांबळे, चोखट आदींनी वरील याचिकेत दिवाणी अर्ज दाखल करुन दुर्राणी यांची याचिका केवळ त्यांच्या अपात्रतेसंदर्भात आहे.

 

त्यासाठी चेअरमनपदाची निवडणूक पुढे ढकलणे संयुक्तिक नसल्याचे म्हटले होते. दरम्यान, या दिवाणी अर्जांवरील सुनावणीच्या वेळी सहायक सरकारी वकिलांनी ‘ते’ निवेदन मागे घेण्याची परवानगी मागितली. खंडपीठाने ती दिली व शासनाने ते निवेदन मागे घेतले. त्यावरुन खंडपीठाने दिवाणी अर्जही निकाली काढले. दुर्राणी यांच्या याचिकेवर ११ जून रोजी सुनावणी होणार आहे. दुर्राणी यांच्या वतीने अॅड. मनीष त्रिपाठी यांच्याकरिता ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे, मूळ तक्रारदार प्रभाकर शिंदे यांच्या वतीने अॅड. एन. आर. तावडे यांच्याकरिता ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. होन आणि शासनातर्फे सहायक सरकारी वकील सुभाष तांबे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...