आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद, हिंगोली, परभणीसह लातूर जिल्ह्यात दमदार पाऊस; मोठ्या प्रमाणावर नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुसळधार पावसामुळे उमरगा तालुक्यातील भिकार सांगवी साठवण तलाव असा ओसंडून वाहत आहे. - Divya Marathi
मुसळधार पावसामुळे उमरगा तालुक्यातील भिकार सांगवी साठवण तलाव असा ओसंडून वाहत आहे.

औरंगाबाद - शुक्रवारी मराठवाड्यातील अनेक भागात मान्सून कार्यरत झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ मंडळांत अतिवृष्टी झाली. तसेच लातूर जिल्ह्यात औसा आणि निलंगा तालुक्यात अतिवृष्टी झाली.  परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला.  


  शुक्रवारी पहाटे झालेल्या पावसाने उमरगा तालुक्यात (जि. उस्मानाबाद)मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जोरदार पर्जन्यवृष्टीने एकीकडे जिल्ह्यातील बळीराजा सुखावला असला तरी उमरगेकरांचे मात्र प्रचंड हाल झाले. पहाटे दोन ते ५ वाजपेर्यंत या भागात ढगफुटी झाल्याने संपूर्ण तालुका जलमय झाला तर तीन तासांत तालुक्यातील ७ तलाव ओव्हरफ्लो झाले. या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले, ७ जनावरे मृत्युमुखी पडली तर १० जनावरे वाहून गेली.  उमरगा शहरातील २०० घरांमध्ये पाणी शिरले.  दरम्यान जिल्ह्यातील ११ महसूल मंडळात रात्रीतून अतिवृष्टी झाली अाहे. सर्वाधिक उमरगा तालुक्यात पाऊस झाला असून, त्यापाठोपाठ तुळजापूर, लोहारा, उस्मानाबाद तालुक्यात पर्जन्यवृष्टी झाली.तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुक्यात पाणीच पाणी झाले आहे.


 हिंगोली, परभणी जिल्ह्यात सर्वदूर दमदार

 आज पहाटे तीन वाजल्यापासून हिंगोली आणि परभणी शहरासह दोन्ही जिल्ह्यांत सर्वदूर  पाऊस झाला.  वसमत तालुक्यातील आसना नदीला या वर्षीच्या पावसाळ्यात पहिलाच मोठा पूर आल्याने परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या तालुक्यातही दमदार पाऊस झाला. वसमत तालुक्यातील आसना नदी काठोकाठ भरून वाहत होती.  वणी गावात पुराचे पाणी घुसल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती. मात्र  दुपारनंतर पाणी ओसरले. 


लातूर जिल्ह्यात  दमदार हजेरी 

निलंगा आणि औसा तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.     निलंगा तालुक्यात ९२ मिमी तर औसा तालुक्यात ९८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. निलंगा शहर, पानचिंचोली आणि मदनसुरी मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर औसा शहर, किल्लारी आणि लामजना मंडळात अतिवृष्टी झाली. तिथे १०० मिमी हून अधिक पाऊस पडला आहे. निलंगा शहरात १२९ मिमी, पानचिंचोली मंडळात १४२ मिमी, मदनसुरी मंडळात १५४, कासारबालकुंदा मंडळात ९० मिमी, निटूर मंडळात ७७ मिमी, अंबुलगा मंडळात ६५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर औसा शहर १०४ मिमी, किल्लारी मंडळ १२८ मिमी, लामजना मंडळ १२५ मंडळ, बेलकुंड मंडळ ९६ मिमी, मातोळा ८३ मिमी, भादा ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे.  

 

नांदेड शहरात रात्रभर मुसळधार
नांदेड शहरात शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. पुणे वेधशाळेत गेल्या चोवीस तासांत १ से. मी. पावसाची नोंद करण्यात आली. रात्री सुरू झालेल्या पावसाने सकाळनंतर उघडीप दिली. पुन्हा दुपारी पावसाला सुरुवात झाली.    जिल्ह्यात गुरुवारी पहाटेच्या सुमारासही पावसाने जोरदार हजेरी लावली होती. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...