आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत दीड महिन्याच्या बालकाचे पिसाळलेल्या कुत्र्याने तोडले लचके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- शहरातील आजम कॉलनी भागात दीड महिन्याच्या बालकाचे पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडल्याची घटना गुरुवारी सकाळी ११. ३० च्या सुमारास घडली. किसन पारस मोरय्या असे या बालकाचे नाव आहे.   


या बाबत अधिक माहिती अशी की, बालकाला त्याच्या आईने दूध पाजून जमिनीवर अंथरुणावर टाकून त्या कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. तोच पिसाळलेल्या कुत्र्याने घरात प्रवेश करून थेट बालकावरच झेप घेतली व लचके तोडण्यास सुरुवात केली. बालकाचा जोराने रडण्याचा आवाज आल्याने आईसह परिसरातील नागरिकांनी बालकाकडे धाव घेतली. त्यामुळे कुत्र्याने तेथून पळ काढला.  


यानंतर पालकांनी व नागरिकांनी बालकाला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. कुत्र्याने  बालकाच्या डाव्या बाजूचा डोळा व डोक्याला जबर चावा घेतला आहे. यामुळे बालक पूर्णतः रक्तबंबाळ झाले होते. बालकावर डॉ. अजय शिराडकर, डॉ. एस.एस. मोरे यांनी उपचार केले. जखम गंभीर असल्याने बालकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आल्याची माहिती डॉ. इनायतुल्ला खान यांनी दिली.  मोरय्या कुटुंब हे मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. मात्र ते हिंगोलीतच ८ ते ९ वर्षापासून कामानिमित्त दाखल झालेले आहे.  दोघे पती- पत्नी शहरातील एका बेकरीवर कामास आहेत. सदरील घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्याची मागणी निवेदनाद्वारे पालिकेकडे  करण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.  

मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली  
शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कुत्र्यांचा अद्याप पालिकेच्यावतीने बंदोबस्त केलेला नाही. विशेष म्हणजे रात्री - अपरात्री मोकाट कुत्रे वाहनांचा पाठलाग करत असून, पादचाऱ्यांवरही धावून जात आहेत. कुत्री एवढी हिंसक बनली आहेत ते त्यांना हाकण्याचा प्रयत्न केला तर जास्तच अंगावर धावून येत आहेत.  

 

कुत्रा पकडण्याच्या सूचना दिल्या  
सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार प्राण्याला हात लावणे तर सोडाच त्याला पकडणेही कठीण झाले आहे. परंतु पिसाळलेला कुत्र्याने चावा घेतला असेल तर त्याला ताब्यात घेऊन मारता येईल. त्यासाठी  पालिका कामगारांना   कुत्रा ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.  मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी  प्रयत्न सुरू आहेत.
- न. प. मुख्याधिकारी, रामदास पाटील

बातम्या आणखी आहेत...