आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसतोड मजुराकडून पत्नीचा गळा दाबून खून, मात्र चक्कर आल्याचा केला कांगावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- घरगुती भांडणातून ऊसतोड मजुराने रात्रीच्या वेळी पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना परळी तालुक्यातील कौठाळी तांड्यावर मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडली. दारूच्या नशेत मजुराने हा खून केला. घटनेनंतर पत्नीचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याचा कांगावा मजुराने केला. ग्रामस्थांनी सकाळी त्याला परळी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात मजुरावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सारख्या मुलीच होत असल्याने दोघांत वाद हाेत असल्याची चर्चा आहे. 


सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील सुनीताचा सात वर्षांपूर्वी परळी तालुक्यातील कौठाळी तांडा येथील दिलीप किसन चव्हाण याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर सुनीताला तीन मुली झाल्या होत्या. त्यातील एका मुलीचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. दिलीप चव्हाण याच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तो आईवडील व पत्नीसह ऊसतोडणीचे काम करत होता. ऊसतोडणीचे काम संपले की ट्रॅक्टरचालक म्हणून दिलीप फडावर काम करत असे. यातूनच त्याला दारूचे व्यसन जडले. 


३ जुलै रोजी सायंकाळी दिलीप चव्हाण दारूच्या नशेत घरी गेला. घरात दिलीप व त्याची पत्नी सुनीता यांच्यात घरगुती कारणातून वादावादी झाली. त्यानंतर दोघांनी जेवण केले. त्यानंतर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोघात पुन्हा भांडणे झाली. या भांडणात दारूच्या नशेतील दिलीप याचा राग अनावर होऊन त्याने रागाच्या भरात सुनीताचा गळा दाबून खून केला. ही घटना घडली तेव्हा दिलीपच्या घराचे दरवाजे बंद हाेते. दिलीपने घराबाहेर जाताना शेजाऱ्यांना सुनीता चक्कर येऊन घरी पडली आहे, ती काहीच बोलत नाही, असे त्याने सांगितले. तेव्हा या तांड्यावरील नागरिकांनी सुनीताला तातडीने परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. सुनीताचे वडील उद्धव राठोड यांच्या तक्रारीनुसार दिलीप याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


आई नाही, वडील अटकेत 
आई सुनीताचा दारुड्या बापाने गळा दाबून खून केल्याने सुनीताच्या दोन मुली आज उघड्यावर पडल्या. यातील एक मोठी मुलगी आजोळी शेळगाव येथे होती. तीन मुलींपैकी एका मुलीचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाल्याने सध्या दोनच मुली आहेत. एकीकडे आईचा खून तर दुसरीकडे वडील खुनाच्या गुन्ह्यात अटकेत. यामुळे सुनीताची चार वर्षांची एक व दोन वर्षांची दुसरी अशा दोन मुली उघड्यावर पडल्या आहेत. 


आरोपीला झाली अटक 
पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर दिलीप हा कौठाळी येथे गावात फिरत होता. बुधवारी सकाळी ग्रामस्थांनी त्याला परळी ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. सहा तासांनंतर सुनीताच्या आईवडिलांना ही घटना कळवण्यात आली. सकाळी सुनीताचे नातेवाईक कौठाळी तांड्यावर व नंतर परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...