आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी निवडणुकीत परळीचा आमदार मीच होणार; आमदार धनंजय मुंडे यांची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळीच्या मलनाथपूर येथील कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे. - Divya Marathi
परळीच्या मलनाथपूर येथील कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे.

बीड - ‘यवतमाळ जिल्ह्यातील वणीच्या एका कार्यक्रमात आपण वणीसाठी परळीची जागा सोडू, असे वक्तव्य केले होते. ते तेथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे, यासाठी केले होते. त्यामुळे स्थानिक विरोधकांना मोठा आनंद झाला होता. मात्र, परळीकरांची इच्छा असल्याने सन २०१९ च्या निवडणुकीत मीच परळीचा आमदार असेल’, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावंडांतील लढत आतापासूनच चर्चेत आली आहे.   


विधानसभा निवडणुकांना दीड वर्षाचा अवधी असला तरीही राजकीय डावपेचांचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. बीड जिल्ह्यात आतापासून परळी मतदारसंघात मुंडे बंधू-भगिनीतील विधानसभेची लढत कशी होईल, त्यात कोण बाजी मारेल याची चर्चा कार्यकर्ते, नागरिकांत रंगत आहे. मात्र, २८ मे रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी   येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असल्याचे सांगत यवतमाळ जिल्ह्यातील वणी, दिग्रस व यवतमाळ या मतदारसंघांवर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार असल्याची घोषणा केली. याच वेळी त्यांनी ‘वेळप्रसंगी परळीची जागा काँग्रेसला सोडू’ अशी टिपणी केेली होती. 

 

एमआयडीसीचे स्वप्न मीच पूर्ण करणार

परळी तालुक्यातील जनतेचे एमआयडीसीचे स्वप्न मीच पूर्ण करणार आहे, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. सत्ता असूनही ज्यांना चार वर्षात एकही प्रकल्प आणता आला नाही त्यांनी आपल्या कामात अडथळा आणू नये. आयता मिळालेला कारखाना नीट चालवून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत, अशी टीकाही त्यांनी  केली.  

 

अशी झाली होती दोघांत लढत 
परळी विधानसभा मतदारसंघात  मुंडे बंधू-भगिनीत २०१४ मध्ये लढत झाली होती. या निवडणुकीत भाजपकडून पंकजा यांनी विजय मिळवला होता. धनंजय दुसऱ्या स्थानी तर काँग्रेसचे त्रिंबक मुंडे तिसऱ्या स्थानी होते. शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी शिवसेनेचा उमेदवार दिला नव्हता.   मात्र २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये पंकजा मुंडे यांचे मताधिक्य घटले होते. 

बातम्या आणखी आहेत...