आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध गर्भपात; माजलगावच्या 2 केंद्रांचे परवाने निलंबित; डॉ.अशोक थोरात यांनी केली कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - बलात्कार पीडितेचा अवैध गर्भपात केल्याप्रकरणी माजलगाव येथील दोन डॉक्टरांच्या गर्भपात केंद्रांचे परवाने सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी निलंबित केले. पोलिसांच्या पत्रानंतर ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत परवाने निलंबित राहणार असल्याची माहिती डॉ. अशोक थोरात यांनी दिली.   


लातूर जिल्ह्यातील मुलगी अंबाजोगाईत पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आली होती. या दरम्यान तिची ओळख माजलगाव येथील एका तरुणाशी झाली. यातूनच त्यांचे प्रेमसंबंध आले अन् त्याने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला. यातून ती गर्भवती राहिल्यानंतर त्याने माजलगावमध्ये तिचा गर्भपात केला होता. दरम्यान, या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिसांत चार महिन्यांपूर्वी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

 

प्रकरणाच्या चौकशीत पीडितेचा गर्भपात झाल्याचे समोर आले होते. यानंतर चौकशीसाठी अंबाजोगाई पोलिसांनी माजलगाव येथील डॉ. ऊर्मिला विजयकुमार जाजू व डॉ. रत्नमाला सुमंतराव वाघ या दोन डॉक्टरांकडे चौकशीही केली होती. काही कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली होती.   


कारवाईसाठी पत्र 

अंबाजोगाईतील प्रकरणात पोलिस विभागाकडून आरोग्य विभागाला संबंधित गर्भपात केंद्रावर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी पत्र पाठवण्यात आले आहे. आरोग्य विभाग या प्रकरणी चौकशी करेल, असे सहायक पोलिस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी,  यांनी सांगितले.


चौकशी सुरू :   पोलिसांच्या पत्रानुसार या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही रुग्णालयातील गर्भपात केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक, डाॅ. अशोक थोरात यांनी सांगितले. 

 

दुसऱ्या डाॅक्टरांच्या नावे मान्यता   
या प्रकरणात नावे समोर आलेल्या दोन्ही महिला डॉक्टर या बीएएमएसची पदवी असलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना गर्भपाताचे अधिकार नाहीत. डॉ. थोरात यांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या स्त्री रोग तज्ज्ञांच्या नावे दोन्ही डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयात गर्भपात केंद्रास परवानगी मिळवल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. आता ज्या स्त्रीरोग तज्ज्ञांच्या नावे हा परवाना होता, त्यांचीही चौकशी होऊ शकते.  

 

बातम्या आणखी आहेत...