आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या तीन वर्षांत रेल्वेमार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण होणार; खा. अशोक चव्हाण यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- मनमाड-परभणी या मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाचे सर्वेक्षण करून ते रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आले आहे. मुदखेड-परभणी या मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून ते डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होणार आहे. येत्या तीन वर्षांत संपूर्ण रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण केले जाईल, अशी  माहिती माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. 


रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या या विभागातील खासदार, सिकंदराबाद येथील जी. एम. विनोदकुमार, डीआरएम. टी. राभा यांच्या उपस्थितीत बोलावलेल्या बैठकीनंतर खा. अशोक चव्हाण पत्रकारांशी बोलत होते.   परभणी- मनमाड, परभणी ते सिकदराबाद या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास रेल्वे बोर्डाने मान्यता देऊन त्यासाठी बजेट मंजूर केल्यास हे काम सुरू होईल. याबरोबरच नांदेड-बिदर या नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले असून तेही रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आले आहे. नांदेड विभागातील रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाला मंजुरी मिळाली आहे. हे काम येत्या तीन वर्षांत म्हणजे २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबईला जाणाऱ्या देवगिरी, तपोवन, नंदीग्राम या गाड्यांचे डब्बे वाढवावेत. समर स्पेशल गाड्यांच्या संख्येत वाढ करावी. रायलसीमा-तिरुपती-निजामाबाद ही गाडी नांदेडपर्यंत आणावी आदी मागण्या बैठकीत मांडल्याचे खा. चव्हाण यांनी  सांगितले. 

 

नांदेड-लातूर नवीन लाइन व्हावी 

सध्या नांदेडहून लातूरला जायचे झाल्यास परभणी, गंगाखेड, परळीमार्गे जावे लागते. या प्रवासाला किमान पाच ते सहा तास लागतात. त्याऐवजी नांदेड-लातूर ही नवी लाइन टाकावी. हे अंतर केवळ १०३ किलोमीटर आहे. नव्या रेल्वे लाइनमुळे निम्म्यापेक्षा जास्त वेळेची बचत होणार असल्याचा मुद्दा  चव्हाण यांनी मांडला. नागपूर, पुणे, मुंबईकडे जाण्यासाठी रात्री गाडी नसल्यामुळे या मार्गावर गाड्या सोडव्यात. रेल्वेचे वेळापत्रक  जाणीवपूर्वक खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्या सोयीसाठी केल्याचा आरोप करून हे वेळापत्रक बदलण्याची मागणी खा.  अशोक चव्हाण यांनी केली.  

 

 

राजा राणी गाडी नांदेडपर्यंत वाढवावी : खासदार सातव 
नांदेडहून मुंबईसाठी नवीन गाडी सुरू करणे शक्य होत नसेल तर मनमाडपर्यंत असलेली राजाराणी ही गाडी नांदेडपर्यंत आणावी, अशी मागणी केल्याचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी सांगितले. हिंगोली ते पोहरादेवीपर्यंत नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यात यावे. अकोल्याहून हिंगोलीमार्गे मुंबईला नवीन गाडी सुरू करावी.  नांदेड, अकोला, आदिलाबाद अशी डेमो गाडी सुरू करावी आदी मागण्याही  सातव यांनी केल्या.  

 

 दुहेरीकरणाचा प्रस्ताव बोर्डाकडे पाठवला :  विनोदकुमार 
मुदखेड-आदिलाबाद-सिकंद्राबाद हा ४२० कि.मी. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवल्याची माहिती जीएम विनोदकुमार यांनी  दिली. नांदेड-बिदर या नव्या रेल्वे लाइनचा प्रस्तावही नोव्हेंबरमध्येच बोर्डाकडे पाठवला आहे. विद्युतीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी रुपये मंजूरही झाले आहेत. खासदारांनी मांडलेल्या प्रश्नांवर सकारात्मक विचार करण्यात येत आहे. जे प्रश्न आमच्या पातळीवर सुटू शकतात ते सोडवण्याचा प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. 

 

बैठकीस सहा खासदारांची दांडी 

या बैठकीस औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, परभणीचे बंडू जाधव, हिंगोलीचे राजीव सातव, नांदेडचे अशोक चव्हाण, अकोल्याचे संजय धोत्रे व आदिलाबादचे जी. नागेश हे  उपस्थित होते.   रावसाहेब दानवे (जालना), आनंदराव अडसूळ (अमरावती), हरिश्चंद्र चव्हाण (दिंडोरी), भावना गवळी (यवतमाळ-वाशिम), राज्यसभा सदस्य राजकुमार धूत, नंदकुमारसिंग चौहान (खंडवा) या ६ खासदारांनी दांडी मारली.दानवे हे सत्ताधारी पक्षाचे असतानाही बैठकीस आले नसल्याने पत्रकारांनी खा. चव्हाण यांना छेडले असता, ते म्हणाले की, त्यांना या बैठकीपेक्षा महत्त्वाचे काम असेल म्हणून कदाचित ते आले नसावेत, अशी कोपरखळी मारली.

बातम्या आणखी आहेत...