आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याला पैसे देतो म्हणत शेतात नेऊन मित्रांच्या मदतीने ठार केले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - गेल्या तीन वर्षांपासून बहिणीला पैशासाठी त्रास देणाऱ्या मेव्हण्याला साळ्याने पैसे देण्याचा बहाणा करीत दुचाकीवर बसवून  शेतात नेले. तेथे अन्य चार मित्रांच्या मदतीने बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच शेतातील पऱ्हाटीवर मृतदेह जाळला. मात्र मृतदेह पूर्णपणे जळाला नसल्याने तो एका गोणीत भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पोलिस पोहोचले. 

 

पाच आरोपींपैकी चौघे अलगद पोलिसांच्या हाती लागले.  जालना-अंबड रोडवर काजळा शिवारात सोमवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अरुण दिगंबर खडके असे मृत व्यक्तीचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण खडके हा सोमवारी सकाळी त्याच्या संजय नगर येथील सासूरवाडीत गेला. तेथे त्याने पत्नी वंदना व सासू शांताबाई जोशी यांच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे न दिल्याने त्याने या दोघींना  शिवीगाळ व मारहाण केली.  सायंकाळी अरुणचा साला शाम  यास हा प्रकार समजल्यानंतर त्याने  अरुण यास दुचाकीवर बसवून काजळा शिवारात नेले. तेथे बळीराम शेषराव कावळे (३०), कृष्णा शेषराव कावळे (२७), गजानन अंकुश काळे (२०, सर्व रा. गोलापांगरी, ता. जालना), शामल पावसल महापुरे या चौघांच्या मदतीने त्यास जबर मारहाण केली. यात अरुणचा जागेवरच मृत्यू झाला.  त्यामुळे आरोपींनी शेतातील कपाशीच्या पऱ्हाटीवर मृतदेह टाकून तो जाळला.  

 

मात्र  मृतदेह अर्धवट जळाला. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी  तो एका  गोणीत भरून टेम्पोमध्ये टाकला. मात्र खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे हे पथकासह तेथे पोहोचल्याने आरोपींचा हा प्रयत्न फसला. पोलिसांनी अर्धवट जळालेला मृतदेह,  टेम्पो (एम.एच.२१.५९४७) जप्त करून चौघांना ताब्यात घेतले. मात्र शामल पावलस महापुरे हा फरार झाला.

 

फिल्मी स्टाइल पाठलाग 

पोलिस काजळा पाटीजवळील पोहोचले तेव्हा  एका शेतात वाहनाचा उजेड दिसला.  पोलिसांनी तिकडे धाव घेतली. पोलिसांना पाहताच आरोपी टेम्पो  व दुचाकीवरून जालना-अंबड रोडच्या दिशेने मृतदेहासह पळाले.  पोलिसांनी त्यांचा फिल्मी स्टाइल पाठलाग करीत टेम्पो अडवून  चौघांना अलगद पकडले.

 

आरोपींची तत्काळ कबुली
गोणीत भरलेला मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला.  मृताच्या पायांच्या गुडघ्याखालचा भाग पूर्णपणे जळालेला होता तर दोन्ही हात कोपरापासून जळालेले होते. चेहराही जळालेला होता.  आरोपींनी दिलेल्या माहितीवरूनच पोलिसांनी मृतदेहाची ओळख अरुण खडकेच्या रूपात पटली.

 

सोमवारीच दिली होती तक्रार
 अरुण  याच्याविरुद्ध त्याची सासू शांताबाई जोशी यांनी कदीम जालना पोलिसांत  तक्रार दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी अदखलपात्र गुन्हाही दाखल केला होता. अरुण  नेहमी घरी येऊन पैशाची मागणी करतो व पैसे दिले नाही तर आपल्याला व मुलगी वंदनाला  मारहाण करतो, असे या तक्रारीत म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...