आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे अस्तित्वच भाजपवर अवलंबून; अशोक चव्हाण यांचे पत्रकार परिषदेत टीकास्त्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - शिवसेनेची भूमिका ही सुरुवातीपासूनच  दुटप्पी राहिलेली आहे. सत्तेसाठी लाचार असलेल्या शिवसेनेत बाहेर पडण्याची हिंमत नाही. आता तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांतही शिवसेना भाजपसोबतच जाईल. कारण शिवसेनेचे अस्तित्वच भाजपवर अवलंबून आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी(दि.नऊ) येथे पत्रकार परिषदेत केला.  


काँग्रेसच्या उपवास आंदोलनानिमित्त प्रदेशाध्यक्ष खा.चव्हाण येथे आले होते. आंदोलनातील सहभागानंतर बी.रघुनाथ सभागृहात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, काँग्रेसचे सभागृह नेते भगवान वाघमारे, बाळासाहेब देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंबीरे,  आदींची प्रमुख उपस्थिती होती.  


खा.चव्हाण यांनी उपवास आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपातील असून यापुढेही या सरकारकने शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न न सोडवल्यास काँग्रेस अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन हाती घेईल, असा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. पीक विम्याचा प्रश्न मोठा बिकट झाला आहे. उत्पन्न कमी असताना जास्तीची आणेवारी काढण्याचे आदेश या सरकारने दिल्यामुळेच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम योग्यरीत्या मिळू न शकत असल्याचे चित्र आहे. शेतीमालास भाव नाही त्यातच खासगी कंपन्यांच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे विम्याचा पैसाही शेतकऱ्याला मिळू शकत नाही. शेतकऱ्यांची थट्टा मांडण्याचे काम सरकार करीत आहे.  


मराठवाड्यात भूसंपादनाचा अत्यल्प मावेजा शेतकऱ्यांना दिला जात आहे. शहरालगतच्या जमिनींनाही ग्रामीण भागातील शेतीचे दरच आकारून कमी भावात खरेदी करण्याचे प्रकार सुरू आहेत.  तूर सडण्याची वेळ आली असून आता पुन्हा तूर खरेदीचे नियोजन कोलमडले आहे. नगरमधील घटनेची चौकशी पूर्ण झाली पाहिजे. त्या घटनेत कोणत्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी असोत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. काँग्रेस कोणाचेही समर्थन करणार नाही, असेही खा.चव्हाण यांनी स्पष्ट केले. पत्रकारांच्या बाबतींत केंद्र सरकार लोकशाहीला मारक अशी भूमिका घेत आहे. पत्रकारांवर कारवाई करण्याची मानसिकता आणि त्याबाबतची भूमिका ही अत्यंत संशयास्पद असून या विरोधात काँग्रेस ठामपणे उभी राहील असेही खा.चव्हाण म्हणाले.

 

आधी तरतूद करा, मगच नारळ फोडा
मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात सरकार रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेत आहे. विकास कामे झाली पाहिजे परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ नारळ फोडायचे आणि प्रत्यक्षात त्या कामासाठी  पुरेशी तरतूद करायची नाही, असा प्रकार सध्या सुरू आहे.  त्यामुळे रस्त्यांसाठी आधी निधीची तरतूद करा मगच नारळ फोडा असा टोलाही खासदार अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या २० एप्रिल रोजीच्या परभणी दौ ऱ्याच्या पार्श्वभूमीवर लगावला.

बातम्या आणखी आहेत...