आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजक सुमोहन आत्महत्या प्रकरण: चंद्रकांत गव्हाणे यांना अटक, 4 दिवसांची पोलिस कोठडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्योजक सुमोहन कनलगा - Divya Marathi
उद्योजक सुमोहन कनलगा

नांदेड- उद्योजक सुमोहन कनलगा यांच्या आत्महत्या प्रकरणी शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि चेंबर कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे सचिव चंद्रकांत गव्हाणे (62) यांना भाग्यनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. या प्रकरणी इतर आरोपींचा शोध चालू आहे. गव्हाणे यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

 

विद्यानगर येथील उद्योजक सुमोहन कनलगा यांनी बुधवारी सायंकाळी राहत्या घरी छातीत गोळी मारून आत्महत्या केली. त्यानंतर त्यांचे छोटे भाऊ मुरलीमोहन राममोहन कनलगा यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. सुमोहन यांच्या आत्महत्येला चंद्रकांत गव्हाणे यांच्यासह बाला रेड्डी (55), विनोद रेड्डी (50, दोघेही रा.हैदराबाद) व जितेंद्र गुप्ता (50,रा. भुवनेश्वर) हे जबाबदार असल्याचे तक्रारीत म्हटले. याप्रकरणी रात्री उशिरा कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रात्री उशिरा चंद्रकांत गव्हाणे यांना अटक केली.  

 
भागीदारीत विश्वासघात  
मुरलीमोहन यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले की, माझा भाऊ व आरोपींनी भागीदारी कंपनीत 3 कोटी 75 लाखाची गुंतवणूक केली होती. कराराप्रमाणे चंद्रकांत गव्हाणे यांनी 50 टक्के गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी गुंतवणूक केली नाही. त्याचप्रमाणे बाला रेड्डी, विनोद रेड्डी यांनी आयसीएसए या कंपनीतून सुमोहन यांचे 80 लाख रुपये परत केले नाहीत. जितेंद्र गुप्ता यांच्याकडूनही 1 कोटी 16 लाख रुपये रक्कम येणे बाकी होते. ही रक्कम सुमोहन यांना जालना व नांदेड येथील आयपीडीएस प्रकल्पातून येणार होती. या व्यवहाराबद्दल ते सतत सांगत होते व पैसे आले नसल्यामुळे तणावात होते. त्यामुळे आत्महत्येपूर्वी त्याने तीन पानी सुसाईड नोट लिहिली. आरोपीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचेही त्याने त्यात लिहिले आहे. त्यांच्या मृत्यूला सर्वस्वी आरोपीच जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी असेही मुरलीमोहन यांनी तक्रारीत म्हटले आहे.
 
चार दिवसांची पोलिस कोठडी  
सुमोहन यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी त्वरित हालचाली करीत चंद्रकांत गव्हाणे यांना ताब्यात घेतले. गुरुवारी दुपारी त्यांना न्या. एन.एल. गायकवाड यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. गायकवाड यांनी गव्हाणे यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. इतर आरोपींचा शोध घेण्याकरिता शोध घेण्यासाठी तपास पथके हैदराबाद व भुवनेश्वर येथे पाठवण्यात येतील असे तपास अधिकारी अनिरुद्ध काकडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...