आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LATUR MURDER: जुन्या पार्टनरनेच सुपारी देऊन घडवली चव्हाण यांची हत्या, मुख्य आरोपीसह 5 अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्य आरोपी चंदनकुमार शर्मा - Divya Marathi
मुख्य आरोपी चंदनकुमार शर्मा

लातूर- लातुरातील 'स्टेप बाय स्टेप' कोचिंग क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांची रविवारी गोळी घालून हत्या झाली होती. या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. चव्हाण यांचा जुना पार्टनर तथा कुमार मॅथ्स क्लासेसचा संचालक प्रा. चंदनकुमारने आर्थिक व्यवहारातील वादामुळे २० लाखांची सुपारी देऊन हा खून घडवून आणल्याचे उघड झाले आहे. प्रकरणात ५ जणांना अटक झाली आहे. 


पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी सांगितले की, हत्येप्रकरणी नातेवाइकांनी दोन राजकीय आणि एका कोचिंग क्लासच्या संचालकांचे नाव संशयित म्हणून घेतले होते. मात्र आमचा इतर अंगानेही तपास सुरू होता. लातूर शहरातील २५ ठिकाणावरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. खबऱ्यांकडूनही माहिती घेतली. त्यातून एक नवा अँगल समोर आला. 


सराईत घरफोड्यामुळे सुगावा
पोलिसांनी कुणाकडे पिस्तूल आहे याची खबऱ्यांकडून माहिती काढली. घरफोडीतील एका सराईत गुन्हेगाराने करण गहेरवारचे नाव सांगितले. त्याचा पोलिसांनी माग काढला आणि गुन्हेगार पोलिसांच्या हाती सापडले. 

 

असे आले चंदनकुमार यांच्या संपर्कात 
कुमार मॅथ्स क्लासेसचे संचालक चंदनकुमार शर्मा (मूळ बिहार, नंतर फरिदाबाद) हे २०१५ मध्ये चव्हाण यांच्या संपर्कात आले. त्या वेळी चंदनकडे फक्त ७ विद्यार्थी होते. ते लातूरमधून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत होते. चव्हाणने त्यांच्यापुढे भागीदारीचा प्रस्ताव ठेवला. चंदन यांनी केवळ शिकवायचे आणि अविनाश चव्हाण यांनी मार्केटिंग, व्यवस्थापन पाहायचे असे ठरले. त्यानंतर विद्यार्थी संख्या वाढून १०० वर गेली. 


गुन्ह्यात अनेक जणांच्या भूमिका

चंदनने महेशचंद्र गोगाडे (मूळ रा. बोरी, ता. लातूर) याला कुणी सुपारी घेते का, याबाबत विचारणा केली. महेशचंद्रने शरद घुमे (नवीन रेणापूर नाका, लातूर) याची भेट घालून दिली. २० लाखांत सौदा ठरला. शरदने मित्र करण गहेरवारलाही सोबतीला घेतले. या दोघांवर आधीही एका खुनाचा गुन्हा नोंद आहे. चंदनने शरदमार्फत करणला पहिला हप्ता म्हणून ८.५ लाख रुपये दिले. यानंतर करणने परळीतील काही जणांमार्फत बिहारमधून दीड लाख रुपयांत पिस्तूल आणि १६ गोळ्या विकत घेतल्या. 


कुणाला संशय येऊ नये म्हणून अारोपी चंदनकुमारने सोमवारी सकाळी रुग्णालयात जाऊन अविनाशच्या वडिलांचे सांत्वन केले. त्यांच्याशेजारीही तो तासभर बसला. दुपारनंतर त्याने फेसबुकवर अविनाशचा फोटो टाकून श्रद्धांजलीची पोस्टही टाकली. 


जुन्या क्लासमध्ये होती २५ टक्क्यंाची भागीदारी 
चव्हाण यांनी स्टेप बाय स्टेप हा नवीन क्लास सुरू केला. तरीही कुमार मॅथ्स क्लासेसमधील त्यांची २५ टक्क्यांची भागीदारी सुरूच होती. त्यावरून चंदन व त्यांच्यात खटकेही उडाले. काही दिवसांपूर्वी एकाने त्यांना चव्हाण तुम्हाला मारणार आहे, असे चंदन यांना सांगितले होते. त्यानंतर कुणीतरी आपल्या पाळतीवर आहे, असा संशयही चंदन यांना आला. अस्वस्थतेमुळे चंदनकुमारने चव्हाण यांना संपवण्याचा निर्णय घेतला. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... कोण होते अविनाश चव्हाण?

बातम्या आणखी आहेत...